Water Tendernama
विदर्भ

Gadchiroli: नळ योजनेचे Tender एकाला अन् काम करतो दुसराच!

टेंडरनामा ब्युरो

गडचिरोली (Gadchiroli) : केंद्र सरकारच्या 'घर घर जल' (Ghar Ghar Jal) या योजनेअंतर्गत जवळपास तीन कोटी रुपये खर्च करून गोरजाई डोहाच्या खालील भागात विहीरगाव घाटाजवळ वाढीव पाणीपुरवठा योजना कार्यान्वित झाली आहे. योजनेचे काम शेवटच्या टप्प्यात आहे. पण संबंधित कंत्राटदाराने (Tender) गावांतर्गत पाइपलाइनसाठी निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरल्याने ठिकठिकाणी पाइपलाइन फुटली आहे. वाढीव पाणीपुरवठा योजना सुरू होण्यापुर्वीच विघ्न निर्माण झाले आहे.

वैरागड येथे उन्हाळ्यात निर्माण होणारी प्रचंड पाणीटंचाईची समस्या लक्षात घेऊन 'हर घर जल' या योजनेअंतर्गत वाढीव पाणीपुरवठा योजना मंजूर झाली. ऑनलाइन टेंडर निघाले. जलकुंभ बांधण्याचे टेंडर गोंदिया येथील एका कंपनीला देण्यात आले. त्याच्याकडून गोरजाई डोहाच्या खालील भागात विहीरगाव घाटाजवळ नळ योजनेच्या दोन विहिरींचे काम शेवटच्या टप्प्यात आहे. नदीकाठावर असलेल्या विहिरीचे काम अपूर्ण आहे. तर नदीपात्रात विहिरीचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित काम लवकरच पूर्ण होईल, असे संबंधित कंत्राटदाराचे म्हणणे आहे. वाढीव पाणीपुरवठा योजनेच्या पाइपलाइनचे ज्यांच्याकडे कंत्राट आहे, त्या कंत्राटदाराचा मनमानी कारभार चालू आहे.

पाणीपुरवठा योजनेचे ज्या कंत्राटदाराला ऑनलाइन टेंडर मिळाले त्याने काही टक्के कमिशन घेऊन हे काम दुसऱ्या व्यक्तीला दिले आहे. पाइपलाइन टाकण्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे केले जात आहे. योजना सुरू होण्यापूर्वीच पाइपलाइन ठिकठिकाणी फुटून जात आहे. ज्यांनी पाइपलाइनचे अधिकृत - टेंडर घेतले आहे त्या कंत्राटदाराविरोधात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी जि. प. गडचिरोली यांच्याकडे गावकरी तक्रार करणार आहेत. या कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकावे, अशी मागणी केली जात आहे.

वैरागड येथील वाढीव पाणीपुरवठा योजनेच्या गावांतर्गत पाइपलाइन टाकण्याचे काम ज्या कंत्राटदाराला निविदेतून मिळाले तीच व्यक्ती काम करीत आहे. पाइपलाइन दर्जेदार आणि व्यवस्थित पूर्ण करण्याचे हमीपत्र लिहून घेतले आहे. नळ योजनेचे काम पूर्ण झाल्यानंतर तपासणी केली जाईल. काम अयोग्य झाल्यास कंत्राटदारावर कारवाई केली जाईल, अशी माहिती एन. एस. पांडे, कनिष्ठ अभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा, उपविभाग, कुरखेडा यांनी दिली.