NIT
NIT Tendernama
विदर्भ

गुंठेवारीतील घरे अशी करा नियमीत! बिल्डर लॉबीमुळे पुन्हा मुदतवाढ?

टेंडरनामा ब्युरो

नागपूर (Nagpur) : गुंठेवारीअंतर्गत अनधिकृत भूखंड, बांधकाम नियमितीकरणासाठी नागपूर सुधार प्रन्यासने प्रक्रिया सुरू केली आहे. आतापर्यंत दोन वेळा मुदतवाढ दिल्यानंतर ६७ हजार अर्ज नियमितीकरणासाठी आले आहेत. हा पसारा आवरण्याच्या पलिकडे असताना पुन्हा तीन महिने यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामागे बिल्डरची लॉबी असल्याची चर्चा नागपूर सुधार प्रन्यासच्या वर्तुळात आहे.

भूखंड नियमितीकरण व कागदपत्रे नागरिकांना जमा करता यावी, यासाठी नासुप्रने या प्रक्रियेला तीन महिन्यांची मुदतवाढ दिली. त्यामुळे आता ही प्रक्रिया २० सप्टेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. नागरिकांनी अर्ज करून, कागदपत्रे जमा करावीत, असे आवाहन नासुप्र सभापती व एनएमआरडीए आयुक्त मनोजकुमार सूर्यवंशी यांंनी केले आहे.

शहरात शेकडो भूखंड मोठमोठ्‍या विकासकांनी अडवून ठेवले आहेत. काही भूखंडांवर विविध आरक्षणे पडली आहेत. मागच्या दाराने ती नियमित करायची असल्याने वाटाघाटी सुरू आहेत. त्याकरिता वारंवार मुदतवाढ दिली जात असल्याची चर्चा आहे.

अनधिकृत बांधकाम व भूखंड नियमितीकरणासाठी नागपूर सुधार प्रन्यासने नागरिकांकडून ऑनलाईन अर्ज मागितले होते. मोठ्या संख्येने नागरिकांनी नियमितीकरणासाठी अर्ज केले होते. या भूखंडाचे विक्रीपत्र, बांधकाम नकाशा आदी कागदपत्रे स्विकारण्यासाठी विशेष मोहिम राबविण्यात आली. सुटीच्या दिवशीही विभागीय कार्यालये सुरू ठेवण्यात आले. नागरिकांनी उदंड प्रतिसाद दिला. आज शेवटचा दिवस असल्याने पूर्व, दक्षिण, पश्चिम विभागीय कार्यालयात नागरिकांची प्रचंड गर्दी होती. ऐनवेळी नागरिकांसाठी काऊंटर लावण्यात आले.

भूखंड व बांधकाम नियमातीकरणासाठी नागरिकांनी भूखंडांचे विक्रीपत्र, ले-आऊटचा नकाशा, विद्यमान बांधकामाचा नकाशा, उपलब्ध भूखंडाचा आर्किटेक्टकडून तयार करण्यात आलेला नकाशा, हमीपत्र, तसेच भूखंडांवर कोणतेही न्यायालयीन प्रकरण नसल्याबाबतचे प्रतिज्ञापत्र प्रत्यक्ष विभागीय कार्यालयात जाऊन जमा केले. परंतु आता पुन्हा अर्ज करता यावेत, यासाठी या प्रक्रियेला मुदतवाढ देण्यात आली.