<div class="paragraphs"><p>Nagpur</p></div>

Nagpur

 

Tendernama

विदर्भ

नागपुरातील चार मजली उड्डाणपुलाची गिनीज बुक रेकॉर्डमध्ये होणार नोंद

टेंडरनामा ब्युरो

नागपूर (Nagpur) : गड्डीगोदाम येथे तयार होत असलेल्या चार मजली उड्डाणपूलाचे काम अंतिम टप्प्यात असून, सद्यस्थितीत दोनशे अधिकारी, कर्मचारी, अभियंता २४ तास काम करीत आहेत. चार मजली उड्डाणपूलामध्ये दोन मजली पूल लोखंडी असून देशातील शहरात होणारा पहिलाच प्रकल्प आहे. त्यामुळे या पुलाबाबत नागपूरकरही उत्सुक आहेत.

तांत्रिकदृष्टया अतिशय कठीण आणि आव्हानात्मक चार स्तरीय वाहतूक व्यवस्थेसाठी महामेट्रोने या उड्डाणपूलाचे काम सुरू केले आहे. महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रजेश दिक्षित यांनी या कामाची पाहणी करीत उर्वरित कामे वेगाने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. देशात पहिल्यांदाच रेल्वे, मेट्रो, जड वाहतूक व हलक्या वाहनांसाठी चारस्तरीय उड्डाणपूल तयार केला जात आहे. सतत व्यस्त रेल्वे मार्गावर अतिशय कठीण स्थितीत ही कामे करण्यात येत आहे.

पहिल्या स्तरावर जमिनी मार्ग (विद्यमान आरयूबी), दुसऱ्या स्तरावर रेल्वे ट्रॅक, तिसऱ्या आणि चौथ्या स्तरावर उड्डानपूल आणि मेट्रो ट्रॅक आहे. जमिनीपासून २४ मीटर उंच ठिकाणी आव्हानात्मक कार्य महामेट्रोच्या वतीने पूर्ण केल्या जात आहे. येथे सुमारे २०० अधिकारी, कर्मचारी, इंजिनियर व कामगार चोवीस तास काम करीत आहे. महामेट्रोने प्रकल्प तयार करताना अनेक ऐतिहासिक रेकॉर्ड स्थापित केले असून, याची नोंद लिमका बुक ऑफ रेकॉर्ड, गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड, इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये करण्याकरीता प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.