Nagpur ZP
Nagpur ZP Tendernama
विदर्भ

Nagpur ZP: पावसाळी कामात वित्त विभागाचा खोडा? हे आहे कारण...

टेंडरनामा ब्युरो

नागपूर (Nagpur) : पावसाळ्यापूर्वी गावागावांमध्ये अंतर्गत रस्ते, नाली, गटारे, पाऊसपाणी निचरा करण्यासह विविध कामे बांधकाम विभागाकडून २५/१५ हेड अंतर्गत करण्यात येते. परंतु सर्व प्रस्ताव वित्त विभागाकडून परत पाठविण्यात येत येत असल्याने यंदा पूरपरिस्थितीचा अधिक धोका निर्माण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

वित्त विभागातील अधिकारी फाईल का अडवत आहेत, याचे कारण कोणी सांगायला तयार नाही. मात्र कामे काही होत नाहीत, हेही तेवढेच खरे आहे. पावसाळा महिन्याभरात सुरू होणार आहे. त्या पूर्वी ही कामे होणे आवश्यक होती. परंतु अद्याप एकही कामाला मंजुरी मिळाली नाही. आता मंजुरी मिळाली तरी पावसाळ्यात कामे करता येणार नाही. त्यामुळे यावर्षी रस्ते, नाला, गटारे, पाऊसपाणी निचऱ्याची कामे होणार नाही. निधी असून त्याचा उपयोग होत नसल्याने सत्ताधारी सदस्यांमध्येच नाराजी आहे. ही सर्व कामे पावसाळ्यापूर्वी होणे आवश्यक आहे.

पावसाळ्यात गटारे चोख होणे, घाण पाणी रस्त्यावर येणे, नळाच्या लाइनमध्ये या दूषित पाणी सिसळवण्या सारख्या घटना होतात. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे. शिवाय पूर परिस्थिती निर्माण होण्याचा धोका असतोच. अशा काळात समाजभवन, समाज मंदिराचे योग्य स्थितीत असल्याचा त्याचा फायदा नागरिकांना होता. परंतु या सर्व कामांना वित्त विभागाकडून ब्रेक देण्यात आला आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अनेक सदस्यांनी या २५/१५ हेड अंतर्गत कामांचे प्रस्ताव तयार केले. हे प्रस्ताव बांधकाम विभागाकडून वित्तीय मंजुरीसाठी वित्त विभागाकडे पाठविण्यात आले. परंतु वित्त विभागाकडून प्रस्तावांनाच मंजुरीच देण्यात येत नाही. वित्त व लेखा अधिकारी मनोज गोसावी यांच्याकडून त्रुटी काढून फाइल पाठविण्यात येते किंवा त्यांच्याकडून अडकून ठेवण्यात येत असल्याची ओरड सदस्यांची आहे. पावसाळ्यानंतर कामे झाल्यास त्याचा फायदा काय, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. 'अर्थपूर्ण' नियोजनातून या फाइल अडवून ठेवण्यात येत असल्याची चर्चा जिल्हा परिषदेत आहे.