Nagpur Municipal Corporation
Nagpur Municipal Corporation Tendernama
विदर्भ

नागपूर मनपाची भन्नाट कल्पना; मलब्यापासून करणार...

टेंडरनामा ब्युरो

नागपूर (Nagpur) : नागपूर शहरात ठिकठिकाणी पडलेले बांधकाम साहित्य, पाडलेल्या घराचा मलबा यावर पुनर्प्रक्रिया करून रेती, विटा, आयब्लॉक आदींची निर्मिती केली जाणार आहे. महापालिकेने (Nagpur Municipal Corporation) एका खाजगी कंपनीकडे हे काम सोपविले आहे. या प्रकल्प उभारणीचे काम डिसेंबरपर्यंत पूर्ण होणार आहे. त्यानंतर पुनर्प्रक्रिया सुरू होणार आहे. कंपनीने सध्या रस्त्याच्या कडेला पडलेला मलबा, बांधकाम साहित्याचे संकलन सुरू केले.

शहरातील पडलेल्या घराचा मलबा, पडीक बांधकाम साहित्यावर पुनप्रक्रिया करून रेती, विटा, आयब्लॉक तयार करण्याची जबाबदारी महापालिकेने हैदराबादच्या सी अॅन्ड डी वेस्ट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला देण्यात आली आहे. या कंपनीला महापालिकेकडून कुठलेही शुल्क दिले जाणार नाही. भांडेवाडी येथे पुनर्प्रक्रिया प्रकल्प उभारला जाणार असून, महापालिकेने कंपनीला पाच एकर जागा दिली आहे. डिसेंबरपर्यंत प्रकल्पाचे काम पूर्ण होणार आहे. ही कंपनी दररोज जवळपास २०० टन मलबा, बांधकाम साहित्य कचऱ्यावर प्रक्रिया करणार आहे. यातून बांधकामाला लागणारे रेती, विटा, आयब्लॉक, टाईल्स बनविण्यात येणार आहे. हा कचरा शहरातून गोळा करण्यासाठी संपूर्ण पायाभूत सुविधांची व्यवस्था कंपनी करणार आहे.

या प्रकल्पामुळे शहरात रस्त्याच्या कडेला, मोकळ्या जागांवर, निवासी भागातील मलबा, बांधकाम साहित्याचा कचरा कमी होणार आहे. यामुळे शहर अधिक स्वच्छ ठेवण्यास मदत होणार आहे. मनपाने नियुक्त केलेल्या या ऑपरेटर कंपनीने सर्वप्रथम शहरातील सर्व भागाचे सर्वेक्षण केले. कंपनीने लक्ष्मीनगर झोनपासून बांधकाम आणि मलबा गोळा करणे सुरू केल्याचे मनपाच्या सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी विभागाच्या कार्यकारी अभियंता डॉ. श्वेता बॅनर्जी यांनी सांगितले.