मुंबई (Mumbai): नागपूरच्या वाढत्या विस्ताराला योग्य सार्वजनिक वाहतूक सुविधा मिळाव्यात, तसेच शहरातील सर्व भाग एकमेकांशी सहजपणे जोडले जावेत यासाठी शासन कटिबद्ध आहे. सध्या शहरातील रस्ते सुविधा चांगल्या असल्या तरी वाहनांची वाढती संख्या लक्षात घेता पायी चालणाऱ्यांसाठी सुरक्षित फूटपाथ, शहरातील विविध भागांना जोडणारे नवीन रस्ते, अपुऱ्या चौकांचे विस्तारीकरण, बसथांबे, मेट्रो स्थानकांना जोडणारी बस सेवा आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा एकत्रित विचार करून सुमारे 25,567 कोटींचा नवीन सर्वसमावेशक गतिशीलता आराखडा (Comprehensive Mobility Plan - CMP) तयार करण्यात आला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत मेट्रो भवन, नागपूर येथे नागपूर शहर व नागपूर महानगर प्रदेशासाठी नवीन सर्वसमावेशक गतिशीलता आराखडा (CMP) तयार करण्याच्या प्रक्रियेबाबत बैठक पार पडली. यावेळी या प्रारूप आराखड्याला अधिक प्रभावी व लोकाभिमुख बनवण्यासाठी नागरिकांचे मत जाणून घेण्याचे निर्देश फडणवीस यांनी बैठकीत दिले.
महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (महामेट्रो) यांनी नागपूर शहर आणि नागपूर महानगर प्रदेशासाठी नवीन सर्वसमावेशक गतिशीलता आराखडा (CMP) तयार करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. ही प्रक्रिया केंद्र सरकारच्या गृह व नगरविकास मंत्रालयाने (MoHUA) निर्धारित केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार राबवली जात आहे. CMP हा दीर्घकालीन धोरणात्मक दस्तावेज असून, तो नागरी आणि मालवाहतूक व्यवस्थेस दिशा देतो. त्याद्वारे एकात्मिक, समावेशक आणि शाश्वत शहरी वाहतूक व्यवस्थेसाठी आवश्यक त्या गुंतवणुकीस मार्गदर्शन मिळते.
नागपूर शहरासाठी पहिला गतिशीलता आराखडा 2013 मध्ये नागपूर सुधार प्रन्यासमार्फत तयार करण्यात आला होता. त्यानंतर जुलै 2018 मध्ये महामेट्रोने नव्याने सर्वेक्षण व सल्लामसलतीनंतर त्यात सुधारणा केली. नागपूरच्या वाढत्या विस्ताराचा विचार करून भविष्यातील गरजा लक्षात घेऊन विभागीय आयुक्त, नागपूर यांच्या अध्यक्षतेखाली सल्लामसलत बैठका घेण्यात आल्या. या बैठकीत मिळालेल्या सूचनांच्या आधारे हा नवीन सर्वसमावेशक गतिशीलता आराखडा तयार करण्यात आला असून, या आराखड्यावर लोकप्रतिनिधींसमवेत सविस्तर चर्चा झाली.
यावेळी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, आमदार कृष्णा खोपडे, आमदार प्रवीण दटके, आमदार समीर मेघे, आमदार चरणसिंग ठाकूर व संबंधित अधिकारी उपस्थित होते.