Ramdaspeth Bridge
Ramdaspeth Bridge Tendernama
विदर्भ

रामदासपेठेतील पुलाच्या अपूर्ण कामामुळे नागरिकांचा आर्थिक भूर्दंड

टेंडरनामा ब्युरो

नागपूर (Nagpur) : रामदासपेठेतील विद्यापीठ ग्रंथालयाजवळील पुलाचे काम संथगतीने सुरू असल्याने नागरिकांना फेरा मारून जावे लागत आहे. अतिरिक्त पेट्रोलच्या खर्चामुळे नागरिकांच्या खिशावर भुर्दंड पडत आहे. फेरा मारताना अलंकार टॉकीज चौकातील वाहतूक कोंडीमुळे लोकांना कार्यालयात पोहोचण्यास विलंब होत असल्याने मनस्तापही सहन करावा लागत आहे.

मागील वर्षी पावसामुळे विद्यापीठ ग्रंथालयाजवळील पुलाचा एक भाग कोसळला होता. त्यानंतर या पुलाच्या नूतनीकरणाला सुरुवात झाली. मागील वर्षी ऑक्टोबरमध्ये पुलाच्या कामासाठी सनी इन्फ्राप्रोजेक्ट प्रा. लि.ला कार्यादेश देण्यात आले. गेल्या वर्षभरापासून हा पूल बंद असल्याने नागरिकांना सिव्हिल लाइन्सला जाण्यासाठी अलंकार टॉकीज चौकातून फेरा घेऊन जावे लागत आहे.

सिव्हिल लाइन्स परिसरात मोठ्या प्रमाणात शासकीय कार्यालये, न्यायालय आदी असल्याने चाकरमाने तसेच नागरिकांसाठी हा रस्ता सहज व सोपा होता. परंतु वर्षभरापासून नागरिकांना ये-जा करताना जवळपास 1 किमीचा अतिरिक्त फेरा मारावा लागत आहे. हजारो नागरिक या रस्त्याने ये-जा करीत असतात.

एका नागरिकाला महिन्याकाठी 30 किमीच्या अतिरिक्त फेऱ्यासाठी अर्धा ते एक लिटर पेट्रोलचा अतिरिक्त खर्च सोसावा लागत आहे. हजारो नागरिकांचा हिशेब केल्यास दर महिन्याला या फेऱ्यासाठी या नागरिकांना जवळपास 30 लाखांचा खर्च पेट्रोलवर करावा लागत आहे. याशिवाय अलंकार टॉकीज चौकातून या बाजूचीही वाहतूक वळविल्याने येथे दररोज कोंडी होत आहे. त्यामुळे अनेक नागरिक, चाकरमान्यांना कार्यालयांमध्ये वेळेत पोहोचणे कठीण झाले आहे. कार्यालयात वेळेत पोहोचत नसल्याने शासकीय कामावरही त्याचा परिणाम दिसून येत आहे.

आर्थिक बोजा आणखी वाढणार

या पुलाचे काम सुरू असल्याने पंचशील चौकापासून कॅनल रस्ता बंद करण्यात आला आहे. या रस्त्यावरील निवासी नागरिकांना घरापर्यंत पोहोचणेही कठीण झाले आहे. या नागरिकांनाही बर्डीकडून घरी यावे लागत आहे. त्यामुळे त्यांनाही पेट्रोलवरील अतिरिक्त खर्च व मनस्ताप दोन्ही सहन करावा लागत आहे.

येत्या दिवाळीपर्यंत पुलाचे काम पूर्ण होईल, असे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. परंतु कंत्राटदार कंपनीचे संथगतीने काम बघता आणखी एक वर्ष हा पूल सुरू होणार नसल्याची चिन्हे आहेत. परिणामी नागरिकांच्या खिशावर व डोक्यावर ताण पडणार आहे.