Devendra Fadnavis
Devendra Fadnavis Tendernama
विदर्भ

Devendra Fadnavis : नागपुरात रामभक्तांसाठी उपमुख्यमंत्री फडणवीसांनी काय दिली गुड न्यूज?

टेंडरनामा ब्युरो

नागपूर (Nagpur) : प्रभू श्रीरामाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पवित्र रामटेक भूमीमध्ये दरवर्षी 22 जानेवारीला रामटेक महोत्सव राज्य सरकारमार्फत घेण्यात येईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केली. तर प्रभू श्रीरामाच्या मंदिराचा 200 कोटींचा विकास आराखडा सुद्धा मंजूर केला. हा निधी डिपॉजिट म्हणून ठेवला जाणार असल्याची घोषणाही त्यांनी केली.

राज्याचा सांस्कृतिक कार्य विभाग व जिल्हा प्रशासनामार्फत रामटेक येथे आयोजित महासंस्कृती महोत्सवच्या तिसऱ्या दिवशी ख्यातनाम भक्ती गीत गायक हंसराज रघुवंशी यांच्या कार्यक्रमाची सुरुवात करताना त्यांनी ही घोषणा केली.

अयोध्या येथे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते रामलल्लाची राममंदिरात प्राणप्रतिष्ठा झाली. या शुभ दिनाची आठवण म्हणून रामटेक येथे दरवर्षी हा महोत्सव घेण्यात येईल, अशी घोषणा फडणवीसांनी केली.    

रामटेकचा विकास आराखडा वर्षभरात अंमलात येईल व या विकास आराखड्याच्या देखभाल दुरुस्तीसाठी कायमस्वरूपी निधीची तरतूद करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. विदर्भातील एक सर्वांग सुंदर धार्मिक पर्यटन स्थळ म्हणून रामटेकच्या विकासासाठी राज्य सरकार वचनबद्ध असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. सांस्कृतिक महोत्सवाची सुरुवात रामटेक सारख्या ऐतिहासिक स्थळावरून होत असल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. 

असा होणार विकास

या विकास आराखड्यात कालिदास स्मारकाचा विकास, सिमेंट रोड, सांडपाण्याच्या नाल्या, पावसाळी पाणी वाहून नेणाऱ्या नाल्या, शौचालये, विद्युतवाहन, पर्यटकांसाठी पुरेसे पार्किंग, म्युझिकल फाउंटेन, वराह मंदिरात रॉक गार्डन आदींचा समावेश आहे. रॉक गार्डनमध्ये रामायणातील विविध घटनांचे देखावे चित्रांच्या रूपात साकारले जाणार आहेत. प्रत्येक सार्वजनिक ठिकाणी सोलर पॅनेलवर विद्युत दिवे व अन्य सुविधा उपलब्ध होणार आहेत.

तसेच खिंडसी तलाव पार्किंग क्षेत्राचा विकास, अंबाळा तलावाचे सौंदर्गीकरण, अस्थी विसर्जनासाठी स्वतंत्र व्यवस्था, नारायण टेकडीचे सौंदर्यीकरण, राखी तलावाचे सौंदर्यीकरण, बालकांसाठी बालोद्यान विकास या कामांचाही पर्यटन विकास आराखड्यात समावेश आहे. रामटेकच्या पर्यटन विकास आराखड्यासाठी उच्च दर्जाचा आर्किटेक्ट नेमून आधुनिक पद्धतीने विकास करण्यासाठी अतिरिक्त सल्लागाराची नियुक्ती करण्यात येणार आहे.