Devendra Fadnavis
Devendra Fadnavis Tendernama
विदर्भ

पोलिसांसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काय दिली गुड न्यूज?

टेंडरनामा ब्युरो

नागपूर (Nagpur) : हिवाळी अधिवेशनात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांसाठी विविध प्रकल्प सुरू केल्याची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, पोलिसांसाठी आतापर्यंत 4078 प्रकल्प हस्तांतरित झालेले असून, 6453 निवासी/अनिवासी प्रकल्प प्रगतीपथावर आहेत. 

300 प्रकल्पांचे टेंडर प्रसिद्ध झाले असून, 4541 प्रकल्प टेंडरस्तरावरील प्राधान्य मिळालेले तर, 21,148 प्रकल्प नियोजनस्तरावर आहेत. 187 पोलिस ठाणे, 46 प्रशासकीय इमारती, 305 सेवा निवासस्थाने प्राधान्यक्रम यादीस सरकारची मंजुरी असल्याची माहिती त्यांनी दिली. मुंबईत सीसीटीव्ही टप्पा 1 मध्ये 5260 कॅमेरे लावले असून अमरावती, नांदेड  येथे टप्पा-2 हाती घेण्यात आला आहे.

राज्यात 23 हजार पोलिस भरती : 

राज्यात 1976 नंतर यावर्षी पोलिसांचा नवीन आकृतीबंध तयार करण्यात आला आहे. यानुसार संपूर्ण आराखडे आणि नियोजन करण्यात येत असल्याचे सांगून 23 हजार पोलिसांची भरती करण्यात येत असल्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

हरविलेल्या मुली आणि महिलांबाबत माहिती देताना ते म्हणाले, महाराष्ट्रात दरवर्षी सरासरी चार हजार मुली आणि 64 हजार महिला बेपत्ता होतात. मागील काही वर्षांच्या तुलनेत हे प्रमाण कमी असून मुली बेपत्ता झाल्याच्या प्रकरणात मुली परत येण्याचे प्रमाण सरासरी 90 टक्के, तर महिलांच्या बाबतीत 86 टक्के आहे. महाराष्ट्रात दाखल गुन्ह्यांचे प्रमाण इतर राज्यांच्या तुलनेत कमी असून 2020 मध्ये ते 3,94,017 तर 2022 मध्ये 3,74,038 इतके असल्याचे त्यांनी सांगितले. महाराष्ट्र नव्हे तर दिल्ली, केरळ, हरियाणा, तेलंगणा, मध्यप्रदेश हे पहिले 5 राज्य असल्याची माहिती त्यांनी दिली.