Mayo Hospital Nagpur (IGGMCH)
Mayo Hospital Nagpur (IGGMCH) Tendernama
विदर्भ

'मेयो'च्या मेडिकल विंगचा खर्च 100 वरून 199 कोटींवर

टेंडरनामा ब्युरो

नागपूर (Nagpur) : इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेयो) रुग्णहिताला प्राधान्य देऊन अपघात विभाग आणि सर्जिकल कॉम्प्लेक्स सेवेत दाखल झाले. अद्ययावत शल्यक्रियाग्रहांची सुविधा असलेल्या या इमारती सेवेत रुजू झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात प्रशासकीय विंग आणि ५०० खाटांच्या क्षमतेचे मेडिसीन विंग प्रस्तावित होते. प्रशासकीय विंगचे बांधकाम सुरू आहे, मात्र मेडिसीन विंगचे बांधकाम चार वर्षे रखडले. यामुळे साडेतीन लाख चौरस फुटातील बांधकाम असलेल्या सात माळ्यांच्या मेडिकल विंगचा नव्याने प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे.

मेयोचे वय दीडशे वर्षांचे आहे. सध्या एकूण ४४ वॉर्ड आहेत. येथील वार्ड क्रमांक १, २, ३, ४, ७, ८, ९, ११, १३, १४ जीर्ण झाले आहेत, असे व्हीएनआयटीने स्ट्रक्चरल ऑडिटनंतर अहवाल दिला आहे. नुकतेच केवळ ५९४ मंजूर खाटांच्या मेयो रुग्णालयात आता एकूण खाटांची क्षमता ८७० पर्यंत गेली आहे. यापैकी ३९० खाटा नव्याने कार्यान्वित झालेल्या सर्जिकल कॉम्प्लेक्समध्ये आहेत. सर्जिकल कॉम्प्लेक्समध्ये अस्थिरोग विभागाचे तीन वॉर्ड, दुसऱ्या माळ्यावर नेत्र विभागाचा एक आणि तिसऱ्या माळ्यावर शल्यक्रिया विभागाचे दोन वॉर्ड कार्यान्वित झाले आहेत. चौथा माळा जळीत रुग्णांसाठी ठेवण्यात आला आहे. कोरोना काळात येथे कोविड वॉर्ड तयार करण्यात आले होते.

मेडिकल विंगचा खर्च वाढला
मेयोत ७७ कोटी खर्च करून सर्जिकल कॉम्प्लेक्स उभारण्यात आले होते. दुसऱ्या टप्प्यातील मेडिकल कॉम्प्लेक्स(विंग)साठी १०० कोटीचा खर्च अपेक्षित होता. या खर्चात आता वाढ झाली आहे. हा खर्च आता १९९ कोटीवर गेला असल्याची माहिती सुत्रांनी दिली. ५०० खाटांच्या क्षमतेची मेडिसिन विंग अर्थात स्वतंत्रपणे मेडिकल कॉम्प्लेक्स रुग्णसेवेत कधी उभे होईल हे सध्यातरी सांगता येत नाही. आगामी दोन वर्षे मेडिसीन कॉम्प्लेक्सची प्रतीक्षा करावी लागणार आहे.