gosekhurd dam
gosekhurd dam Tendernama
विदर्भ

कागदोपत्री कामे दाखवून १६ कोटींची उचल; कंत्राटदारांमध्येच वाद

टेंडरनामा ब्युरो

नागपूर (Nagpur) : गोसेखुर्द धरणाची प्रकल्पग्रस्तांचे कामे कागदोपत्री दाखवून सुमारे १६ कोटी रुपयांची उचल करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुख्य कंत्राटदार आणि पेटी कंत्राटदारांमध्ये पैशावरून वाद झाला. त्यामुळे ४० टक्के शिल्लक राहिले असून गावकरी मात्र या वादाने त्रस्त झाले आहेत.

विदर्भ सिंचन मंडळाने नॅशनल बिल्डिग कंस्ट्रक्शन कंपनीला पुनर्वसनाचे कंत्राट दिले होते. या प्रकल्पातील बोरी दोन आणि बोरी तीन येथील पुनर्वसनाचे काम करायचे होते. नॅशनल बिल्डिंग कस्ट्रंक्शन कंपनीने दिल्ली येथील एका खासगी कंपनीला विकास कामाचे १६ कोटीचे कंत्राट दिले होते. त्या कंपनीने स्थानिक कंपनीला पेटी कंत्राट देऊन हे काम करून घेतले. एनबीसीसी कंपनीने ६० टक्क्यांपेक्षा अधिक काम केल्याचे कागदोपत्री दाखवून सर्वच रक्कम वसूल केली. मात्र, स्थानिक कंपनीला दिल्ली येथील कंपनीने केलेले कामाचा निधीच दिला नाही. त्यामुळे येथील कामे थांबली होती. आता पावसाळा सुरू झाल्याने पावसाळ्यापूर्वी केलेल्या कामाची स्थिती बिकट झालेली आहे. यास्थितीत स्थानिकांमध्ये रोष वाढलेला आहे.

याबाबत विदर्भ सिंचन विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला मात्र, त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. कोरोनाच्या टाळेबंदीत या परिसरातील कामे अनेक कंत्राटदारांनी केले आहे. त्यात डांबरी रस्ते आणि पायभूत सुविधांचा समावेश आहे. गावकऱ्यांनीही रस्ते बांधले असले तरी गटार नाले बांधल्याशिवाय रस्ते करू देणार नाही अशी भूमिका बोरी येथील सरपंच आणि गावकऱ्यांनी घेतली होती. त्यामुळे कंत्राटदाराला या परिसरात काम करणे अवघड झालेले होते. त्या स्थितीतही पावसाळ्यापूर्वी नागरिकांच्या सुविधेसाठी रस्त्याची कामे करण्यावर भर दिला. काही गावकऱ्यांनी एनबीसीसीकडे तक्रारी केल्या. याबाबत विदर्भ सिंचन विभागाकडे पाठपुरावा केला असता त्यांनी आम्ही सर्वच काम एनबीसीसीकडे दिलेले आहे असे सांगून अधिक बोलण्यास टाळले. सततच्या पावसामुळे या गावातील रस्त्याची स्थिती बिकट झाली असून नाल्याचे कामही अपूर्ण राहिल्याने कोट्यावधी रुपयांचा चुराडा झाला आहे.