government medical college nagpur
government medical college nagpur Tendernama
विदर्भ

Nagpur : मेडिकलमध्ये 6 कोटीत ठेकेदार करत आहे 'हाथ की सफाई'

टेंडरनामा ब्युरो

नागपूर (Nagpur) : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या स्वागताची मेडिकलमध्ये जय्यत तयारी सुरू असून, प्रवेशद्वार व इमारतींना रंगरंगोटी करण्यात येत आहे. या कामासाठी राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने सहा कोटींचे टेंडर काढले. पण कंत्राटदारांकडून टेंडरमधील अटी धाब्यावर बसवून प्रत्यक्ष कामे होत असल्याचे दिसून येत आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाचा (मेडिकल) अमृतमहोत्सव पुढील महिन्यात आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू येणार आहेत. त्यामुळे मेडिकल चकचकीत करण्यासाठी राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने विविध कामांसाठी सहा कोटी रुपयांच्या कामाचे टेंडर काढले असून, इमारतींना चकाकी देण्याचा केविलवाणा प्रयत्न कंत्राटदार करीत असल्याचे चित्र आहे. टेंडरमधील अटींना बाजूला सारून मेडिकलमधील इमारतींना रंगरंगोटी सुरू असल्याचे दिसून येत आहे. मेडिकलमध्ये इमारती जुन्या झाल्या आहेत. अनेक ठिकाणी प्लास्टर निघून रंगही उडाला आहे. त्यामुळे नवीन रंगरंगोटी करताना भिंती घासून प्रायमर मारणे, त्यानंतर दोन कोट रंगरंगोटीचे, त्यानंतर दोन दिवस पाण्याचा मारा करणे अपेक्षित आहे. किंबहुना टेंडरमध्ये या अटी आहेत. परंतु काही रंगरंगोटी झालेल्या इमारतींना कुठेही दोन कोट दिसून येत नाही. याशिवाय आज प्रवेशद्वाराजवळील एका छोट्या इमारतीला काही मजूर रंगरंगोटी करताना भिंती न घासताच रंगरंगोटी सुरू असल्याचे आढळून आले.

मुख्य प्रवेशद्वारावरील लोखंडी गेट असून, त्याला न पुसताच काळा पेंट लावण्याचे काम सुरू होते. विशेष म्हणजे कंत्राटदारांच्या या कामावर लक्ष देण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागातील अभियंते व उपअभियंत्यांनाही वेळ नसल्याने केवळ कामाची औपचारिकाता पूर्ण केली जात असल्याने राष्ट्रपतींच्या दौऱ्याबाबतही सार्वजनिक बांधकाम विभाग गंभीर नसल्याचा आरोप होत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे मेडिकल परिसरातील रस्त्यांच्या डागडुजीसाठी 1 कोटी रुपये खर्च केले जाणार आहे. सध्याच्या कामाचा दर्जा पाहता रस्त्याच्या डागडुजीच्या कामाबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग किती गांभीर्य दाखवतो, याकडे लक्ष लागले आहे. याशिवाय अमृतमहोत्सव सोहळ्याचे आयोजन होणार असलेला परिसर चकचकीत करण्यासाठी 22 लाखांचा खर्च प्रस्तावित आहे.