Nitin Gadkari
Nitin Gadkari Tendernama
विदर्भ

Nagpur : विकासकामांच्या दर्जाबाबत गडकरींनी अधिकाऱ्यांना खडसावले

टेंडरनामा ब्युरो

नागपूर (Nagpur) : आपल्या रुबाबदार व्यक्तिमत्वाने ओळखले जाणारे केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांना आपल्या कामात नेहमीच परफेक्शन पाहिजे मग ते मोठमोठे प्रकल्प असो की अनेक विकास कार्य, शुक्रवारी नागपुरात रवी भवन सभागृहात झालेल्या बैठकीत त्यांनी प्रकल्पांच्या तसेच विकास कामांच्या दर्जाच्या बाबतीत कोणत्याही प्रकारची तडजोड करू नये, असे स्पष्ट निर्देश अधिकाऱ्यांना दिले.

या प्रकल्पांवर झाली चर्चा 

रेशीमबाग मैदानाचा विकास, स्वदेश दर्शन योजनेअंतर्गत वाकी, धापेवाडा, पारडसिंगा व गिरड तिर्थक्षेत्राचा विकास, मौदा मार्गावरील परमात्मा एक सेवक प्रकल्प, पश्चिम व उत्तर नागपुरातील रस्त्यांची कामे, पुनापूर-भरतवाडा येथील विटा भट्टीच्या जमिनीचा प्रश्न, चौक व उद्यानांचे सौंदर्यीकरण इत्यादी अनेक विषयांवर या बैठकीत चर्चा झाली. विकास योजनांसाठी वापरला जाणारा पैसा हा जनतेचा आहे. आपण त्याच्या योग्य वापराची काळजी घेणे अपेक्षित आहे. कारण आपण त्या निधीचे विश्वस्त आहोत, असे म्हणत नितीन गडकरी यांनी अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्दश दिले.

ते म्हणाले की, अधिकाऱ्यांनी कुणाचाही मुलाहिजा न करता कामाच्या दर्जाबद्दल काटेकोर राहिले पाहिजे. त्या बाबतीत कोणत्याही प्रकारची तडजोड स्वीकारता कामा नये. गरज पडल्यास अधिकारयांनी कंत्राटदारांवर कायदेशीर कारवाई करावी आणि दर्जेदार नसलेली कामे जमीनदोस्त करून पुन्हा बांधायला लावावीत. कामाचा दर्जा उत्तम राखणे, दिलेल्या मुदतीत काम पूर्ण होणे आणि त्यासाठी सतत पाठपुरावा करणे ही अधिकारयांची जबाबदारी आहे. कामांमध्ये हयगय हलगर्जीपणा झाल्यास कंत्राटदारांसोबत अधिकारयांना देखील जबाबदार धरले जाईल व त्यांच्या काययानुसार कारवाई केली जाईल, असा इशाराही नितीन गडकरी यांनी दिला.

नागपूर शहर व जिल्ह्यातील विविध प्रकल्प, योजना तसेच विकास कामांच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात आली होती, या बैठकीत आमदार कृष्णा खोपडे, विकास कुंभारे, प्रवीण दटके, मोहन मते यांच्यासह जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर, महापालिका आयुक्त बी. राधाकृष्णन, नासुप्रचे सभापती डॉ. मनोज सूर्यवंशी व इतर अधिकारी उपस्थित होते.