Mnerga
Mnerga Tendernam
विदर्भ

Yavatmal : मोदीजी, 3 महिन्यांपासून हजारो मजुरांची 15 कोटींची मजुरी का आहे थकीत?

टेंडरनामा ब्युरो

यवतमाळ (Yavatmal) : ग्रामीण भागातील मजुरांच्या हाताला काम मिळावे, म्हणून महात्मा गांधी रोजगार हमी योजना सुरू करण्यात आली. जिल्हाभरात रोहयोच्या कामावर राबलेल्या आठ हजार मजुरांचे 15 कोटी रुपये थकीत आहे. जानेवारी महिन्यापासून या मजुरांना थकीत असलेल्या उधारीची प्रतीक्षा आहे.

जिल्ह्यात मोठे उद्योग नसल्याने मजुरांच्या हाताला काम मिळत नाही. खरीप हंगामात मजुरांना शेतात मिळणाऱ्या मजुरीवरच उदरनिर्वाह करावा लागतो. त्यामुळे मोठ्या प्रमाणात मजुरांना कामाच्या शोधात परजिल्ह्यासह राज्यात स्थलांतर करावे लागते. गावातच रोजगार मिळत असल्याने, स्थलांतर करणाऱ्यांची संख्या कमी झाल्याचे सांगितले जाते. जिल्ह्यात सहा लाख 67 हजार 539 जॉब कार्डधारक असून, मजुरांची संख्या 13 लाख 60 हजार 891 आहे. जॉब कार्डधारकांना शंभर दिवस रोजगार मिळत असल्याचा दावा केला जातो. वर्षभरात एक लाख 85 हजार 281 मजुरांच्या हाताला काम मिळाले. हे मजूर सिंचन विहिर, घरकूल, फळबाग, पांदणरस्त्याच्या कामावर राबले. जानेवारीपासून महिन्यापासून अकुशल कामाचा निधी केंद्राकडून आला नाही. त्यामुळे आठ हजार मजुरांना मजुरीसाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. रोहयोच्या कामावर राबणाऱ्या मजुरांना पंधरा दिवसांत मजुरी मिळते. प्रथमच मजुरांना हक्काच्या दामापासून दीर्घकाळ वंचित राहावे लागत आहे. मात्र, एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात थकीत रक्कम मिळणार असल्याची माहिती रोहयो कार्यालयाने दिली.

1 एप्रिलपासून 24 रुपये वाढ : 

2023 मध्ये रोहयोच्या मजुरांना 273 रुपये मजुरी मिळत होती. 2024 मध्ये आता मजुरीत 24 रुपयाने वाढ करण्यात आली असून, 297 रुपये मिळणार आहे. जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढतच चालले आहे. त्यामुळे वाढत्या महागाईच्या काळात जीवन कसे जगायचे, असा प्रश्न मजूरवर्गापुढे आहे. 24 रुपयांची वाढ करण्यात आल्याने थोडा-फार दिलासा मिळाला आहे. एक एप्रिलपासून रोहयोच्या कामावर राबणाच्या मजुरांना वाढीव दराने मजुरी मिळणार आहे.

उमरखेड जास्त तर, मारेगाव कमी :

उमरखेड तालुक्यात सर्वाधिक जास्त 24 हजार 709 मजूर कामावर राबले, तर मारेगाव तालुक्यात सर्वात कमी पाच हजार 36 हजार मजूर आहेत. बाभूळगाव, घाटंजी, केळापूर, राळेगाव, वणी, झरी या तालुक्यात प्रत्येकी दहा हजारांपेक्षा कमी मजुरांच्या हाताला काम मिळाले.