Hospital
Hospital Tendernama
विदर्भ

Nagpur : कॅन्सर इन्स्टिट्यूटचे भूमिपूजन कधी होणार?

टेंडरनामा ब्युरो

नागपूर (Nagpur) : तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मेडिकलमधील कॅन्सर संस्थेच्या उभारणीचा 2012 मध्ये निर्णय घेतला होता. 11 वर्षांनंतर शिंदे-फडणवीस सरकारच्या कार्यकाळात या निर्णयाची अंमलबजावणी होत आहे. मेडिकलमध्ये जागा निश्चित झाली असून, कॅन्सर इन्स्टिट्यूटच्या कामाच्या भूमिपूजनाची प्रतीक्षा मेडिकल प्रशासन करीत आहे.

विदर्भासह नागपूर ही मुखाच्या कॅन्सरची राजधानी बनली आहे. इतरही कॅन्सरचे प्रमाण अधिक आहे. 2012 मध्ये काँग्रेस सरकारच्या कार्यकाळात मेडिकलमध्ये कॅन्सर इन्स्टिटयूट स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. नंतर सत्ताबदल झाला आणि मेडिकलमधील कॅन्सर संस्था औरंगाबादला हलवण्यात आली. कॅन्सररोग विभागप्रमुख कृष्णा कांबळे यांनी संस्थेचे चार प्रस्ताव तयार केले होते. परंतु शासनाने याकडे साफ दुर्लक्ष केले. अखेर डॉ. कांबळे निवृत्त झाल्यानंतर त्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. उच्च न्यायालयाने दीड वर्षांत कॅन्सर संस्था उभारण्याचे निर्देश दिले. यामुळे मेडिकलमध्ये कॅन्सर इन्स्टिट्यूट तयार होत आहे. मेडिकलच्या टीबी वॉर्ड येथे 5 एकर परिसरात उभारण्यात येणाऱ्या कॅन्सर इन्स्टिट्यूटसाठी 76 कोटीचा निधी मंजूर झाला आहे. पहिल्या टप्प्यात 20 कोटीच मिळाला असून मेडिकल प्रशासनाने एनएमआरडीएकडे सुपूर्द केला आहे. टेंडरनुसार कंत्राटदारांची नावे निश्चित झाली आहेत. सध्या 3 मजली इमारत बांधण्यात येणार असून आगामी काळात 5 माळ्यांपर्यंत या इमारतीचा विस्तार करण्यात येईल.

महापालिकेकडून पाहणी

टीबी वॉर्ड परिसरात प्रस्तावित कॅन्सर संस्थेच्या इमारतीच्या बांधकामासाठी 5 एकर जागा निश्चित केली. 37 आणि 38 क्रमांकाचे वॉर्ड पाहून येथे ही संस्था उभारण्यात येणार आहे. या परिसरात काही वृक्ष आहेत. ते तोडण्यासाठी महापालिका पथकाने 2-3 वेळा पाहणी केली. लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत उपचाराची सुविधा उपलब्ध होणार आहे. सरकारकडून निधी प्राप्त झाला आहे. हा निधी एनएमआरडीएकडे सुपूर्द करण्यात आला आहे. टीबी वॉर्ड कॅम्पसमधील जागा निश्चित करण्यात आली आहे. लवकरच  दुसरा माळा रेडिओथेरपी बाह्यरुग्ण विभाग, भूमिपूजनाची तारीख मिळाली की. भूमीपूजन होईल. मेडिकलमध्ये कॅन्सर इन्स्टिट्यूटचे गतीने सुरु होईल. अशी माहिती मेडिकल चे डीन डॉ.राज गजभिये यांनी दिली.

असे असणार कॅन्सर इन्स्टिट्यूट

पहिला माळा : रेडिएशन ऑन्कोलॉजी, रेडिओलॉजी, पॅथॉलॉजी, न्यूक्लिअर मेडिसिन, आपत्कालीन आणि सहाय्यक कर्मचाऱ्यांची सोय असेल.

दुसरा माळा : रेडिओथेरपी बाह्यरुग्ण विभाग, सर्जरी वॉर्ड, मेडिसिन वॉर्ड, केमो थेरपी, दुसऱ्या मजल्यावर कोबाल्ट युनिट सुविधा.

तिसरा माळा : अत्याधुनिक बाल कॅन्सर विभाग, शस्त्रक्रियेसाठी स्वतंत्र वॉर्ड तसेच ऑपरेशन थिएटर