E Waste
E Waste Tendernama
विदर्भ

यवतमाळकरांसमोर मोठा प्रश्न; 700 किलो ई-वेस्टचे करायचे काय?

टेंडरनामा ब्युरो

यवतमाळ (Yavatmal) : यवतमाळ शहरात पहिल्यांदाच ई-वेस्ट (इलेक्ट्रॉनिक कचरा) संकलित करण्याची मोहिम सुरू झाली आहे. याअंतर्गत सातशे किलोंपेक्षा जास्त ई-वेस्टची नोंदणी करण्यात आली असून, या कचऱ्याचे करायचे काय, असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. (Yavatmal - E Waste)

या पर्यावरणपूरक उपक्रमासाठी प्रयास यवतमाळ, यवतमाळ प्लॉगर्स, जगदंबा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी लोहारा येथील औद्योगिक वसाहतीमध्ये प्रचार, प्रसार केला. शहरातील व्यावसायिक प्रतिष्ठाने, शासकीय कार्यालये, पतसंस्था आदी ठिकाणी लोकांना माहिती देऊन जनजागृती करण्यात आली. इलेक्ट्रॉनिक कचऱ्यामुळे आरोग्य आणि पर्यावरण यांचे होणाऱ्या नुकसानाची कल्पना देण्यात आली. शहरातील जाजू स्कूल, वसंतराव नाईक शाळा, बजाज, बनगीनवार, जैन ब्रदर्स, जगदंबा अभियांत्रिकी आदी ठिकाणाहून स्वयंस्फूर्तीने नोंदणी करण्यात आली. नगर परिषद वाहनतळ येथेही शंभर किलोपेक्षा जास्त इलेक्ट्रॉनिक्स कचरा नागरिकांनी जमा केला. या उपक्रमात शंभर किलोपेक्षा जास्त ई-वेस्ट देणार असलेल्यांकडून थेट त्यांच्या जागेवर जाऊनच हा ई-कचरा आयोजकांकडून जमा करण्यात येणार आहे.

नगर परिषद कार्यालयाच्या वाहनतळ येथे यवतमाळकरांकडून ई-वेस्ट स्वीकारण्यात आला. इलेक्ट्रॉनिक, इलेक्ट्रिक, बॅटरीवर चालणारी उपकरणे, संगणक संबंधित सर्व साहित्य, टीव्ही, मोबाईल, शीतकरण यंत्रे, सीडी, कॅसेट्स, माहिती तंत्रज्ञान आधारित वस्तू आदी ई-वेस्टमध्ये येतात. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि शासनाची नोंदणी व परवानगी असलेल्या संस्था आणि कंपनीमार्फत रीतसर व नियमानुसार या ई-कचऱ्याचे कुठलेही प्रदूषण न होता रिसायकल व वर्गीकरण होणार आहे. वातावरण, जल, वायू, मातीसह समस्त पर्यावरण दूषित करणारा हा ई-कचरा आरोग्यासही हानिकारक आहे.