Nagpur
Nagpur Tendernama
विदर्भ

Nagpur : ऑरेंज सिटीतील वाहतूक पोलिसही होणार 'स्मार्ट'; कारण...

टेंडरनामा ब्युरो

नागपूर (Nagpur) : नागपूर शहरातील चौकाचौकात असलेल्या बहुतांश वाहतूक पोलिसांच्या बूथची (Traffic Police Booth) अवस्था बिकट झाली आहे. आता स्मार्ट सिटीमध्ये (Smart City) वाहतूक पोलिस कर्मचाऱ्यांना स्मार्ट पोलिस बूथ देण्यात येत असून, लवकरच ते विविध चौकात बसवण्यात येणार आहेत. यामुळे पोलिस कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले.

हे पोलिस बूथ ऊन आणि पावसापासून संरक्षण करतील, त्याचबरोबर वाहतूक हाताळण्यासही त्यामुळे चांगली मदत होणार आहे. स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनतर्फे पोलिस विभागाला नवीन बूथ उपलब्ध करून दिले जात आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले.

बहुतांश चौकातील पोलिस बूथ एकतर तुटलेले किंवा जीर्ण झाले होते आता हे नवीन बूथ दिसायला आकर्षक असणार आहेत व खूप उपयुक्त देखील सिद्ध होतील. सध्या काही जागा निश्चित करण्यात आल्या आहेत. लवकरच असे सुंदर बूथ शहराच्या चौकाचौकात पाहायला मिळतील, असेही कुमार यांनी पुढे सांगितेल.

यासंदर्भात स्मार्ट सिटीचे महाव्यवस्थापक शील घुले यांनी सांगितले की, जी-20 ची बैठक लक्षात घेऊन शहरातील विविध भागात काम सुरू आहे. त्यात पोलिस बूथचाही समावेश होता, मात्र बूथ केवळ डोके झाकण्यासाठी नसावेत, असा त्यांचा प्रयत्न होता. बूथमध्ये पोलिसांना चांगली सुविधा मिळावी म्हणून त्याची खास रचना करण्यात आली आहे. 

लोखंडाच्या सँडविच पॅनेलच्या 2 स्तरांपासून हे बूथ तयार केले जाणार आहे. त्याच्या मध्यभागी एक थर असेल तर ते बाह्य तापमान 2 ते 3 अंशांनी कमी करेल. बूथ खूप मजबूत देखील असेल. चौकाचौकात तैनात असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांकडे त्याचे डिजिटल कोड असतील. फक्त पोलिस हे बूथ विशेष की कोडसह उघडू आणि बंद करू शकतील. रहदारी नसताना पोलिसही आत बसून विश्रांती घेऊ शकतात. यासाठी आतमध्ये साधा पंखा आणि एक्झॉस्ट फॅनही बसवण्यात आला आहे. त्यात सार्वजनिक उद्घोषणा यंत्रणाही बसवण्यात आली आहे.

पोलिस आत बसूनच वाहनचालकांना सूचना देऊ शकतात. ते सौरऊर्जेद्वारे चालवले जाईल. आत आणि बाहेर सेन्सर दिवे बसवले आहेत. जर कोणी नसेल तर दिवे आपोआप बंद होतील. सध्या बूथसाठी 50 जागा निश्चित करण्यात आल्या आहेत. पोलिसांकडून या ठिकाणांची माहिती घेतली जात आहे. पहिल्या टप्प्यात 20 बूथ उभारले जात आहेत. लवकरच इतर ठिकाणीही नवीन बूथ उभारले जातील.