scam
scam Tendernama
विदर्भ

अबब! एका वर्षात समोर आले 32 हजार कोटींचे घोटाळे

टेंडरनामा ब्युरो

नागपूर (Nagpur) : बँकांमधील आर्थिक घोटाळ्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. मागील काही वर्षांत आर्थिक घोटाळे मोठ्या प्रमाणात झाले आहेत. 1 एप्रिल 2022 ते 31 मार्च 2023 या आर्थिक वर्षादरम्यान रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अंतर्गत येणाऱ्या देशभरातील बँकांमध्ये एकूण 32 हजार कोटीचे आर्थिक घोटाळे झाले असून यापोटी 95 हजार 929 प्रकरणांची नोंद झाली आहे.

आर्थिक घोटाळे करून विदेशात पळून जाणाऱ्या उद्योगपतींमुळे बँका त्रस्त आहेत. बँकांचा एनपीए सातत्याने वाढत आहे. यामुळे सामान्यांचा बँकांवरील विश्वास उडत चालला आहे. या पार्श्वभूमीवर आरटीआय कार्यकर्ता अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकारांतर्गत बँकांमधील आर्थिक घोटाळे, त्यामध्ये बँक कर्मचाऱ्यांचा अंतर्भाव, बंद पडलेल्या बँका आदींची माहिती मागितली. त्यावर मिळालेल्या उत्तरानुसार, 1 एप्रिल 2022 ते 31 मार्च 2023 या आर्थिक वर्षांदरम्यान बँक कर्मचाऱ्यांचाच समावेश असलेल्या आर्थिक घोटाळ्यांची संख्या 3 हजार 318 असून यामध्ये 3647.92 कोटी इतकी रक्कम समाविष्ट आहे. तर को-ऑपरेटिव्ह बँकांमधील आर्थिक घोटाळ्यांची संख्या 764 असून त्यात 4140.54 कोटीइतकी रक्कम समाविष्ट आहे. तसेच आजघडीला शेड्युल कमर्शिअल बँकांमध्ये 14 लाख 50 हजार 405 कर्मचारी कार्यरत आहेत. तर को-ऑपरेटिव्ह बँकांमध्ये कर्मचाऱ्यांची संख्या 1 लाख 894 इतकी आहे.

नऊ बँकांचा परवाना रद्द

1 एप्रिल 2022 ते 31 मार्च 2023 या काळात नऊ अर्बन को ऑपरेटिव बँकांचे परवाने रद्द करण्यात आले आहेत. यामध्ये दी मुधोळ को-ऑप्सटिव्ह बँक लिमिटेड, मिल्लाथ को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, श्री आनंद को-ऑपरेटिव बैंक लिमिटेड, डेक्कन अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, दी लक्ष्मी को- ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, दी सेवा विकास को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, रुप को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, बाबाजी दाते महिला सहकारी बँक लिमिटेड गन्हा को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड यांचा समावेश आहे. यातील बाबाजी दाते महिला सहकारी बँक लिमिटेड ही यवतमाळ तर दी लक्ष्मी को-ऑपरेटिव्ह बैंक लिमिटेड ही सोलापूर येथील बँक आहे.