Devendra Phadnavis
Devendra Phadnavis Tendernama
विदर्भ

देवेंद्र फडणवीसांच्या मतदारसंघातील 'त्या' ठेकेदाराला कोणाचे अभय?

टेंडरनामा ब्युरो

नागपूर (Nagpur) : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Phadnavis) यांच्या दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातील गोपाळनगरातील (Gopal Nagar) सिमेंट रस्त्याचे काम अर्धवट सोडल्यानंतरही महापालिका कुठलीच कारवाई करीत नसल्याने संबंधित ठेकेदाराला कोण अभय देते आहे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. (Nitin Gadkari - Nagpur)

विशेष म्हणजे, गोपाळनगर प्रभागातील चारही नगरसेवक भाजपचेच आहेत. असे असताना कंत्राटदार काम सोडून गेल्यानंतरही कोणी तक्रार करायला पुढे आला नाही. महापालिकेच्या एकाही अधिकाऱ्याने अद्याप याची दखल घेतली नाही, तसेच कार्यवाहीसुद्धा केलेली नाही.

गोपळनगरच्या मुख्य रस्त्याचे काँक्रिटीकरणाचे टेंडर महापालिकेने आठ महिन्यांपूर्वी सचिन नाईक या ठेकेदाराला दिले होते. त्याने कामाला सुरवात केली. मात्र चार महिन्यांपासून काम पुढेच सरकात नाही. त्यामुळे रस्ता अर्धवट खोदलेला पडून आहे. पावसाळ्यामुळे जागोजागी पाणी साचले आहे. त्यामुळे रोजच रात्री कोणीना कुणी या खड्ड्यात पडून जखमी होतो. हा सचिन नाईक नावाचा ठेकेदार भाजपच्याच एका नेत्याशी संबंधित आहे. त्यामुळे कोणीच त्याच्या विरोधात तक्रार करीत नाही. मात्र त्यामुळे परिसरातील नागरिकांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागत आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांच्या शहरात ठेकेदारांची अशी मनमर्जी सुरू आहे. त्यानंतरही अधिकारी कुठलीच कारवाई करीत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या परिसरातील नागरिकांनी ठेकेदारशी संपर्क साधला असताना पाऊस असल्याने काम बंद ठेवण्यात आल्याचे त्याने सांगितले. मात्र त्यापूर्वीपासूनच काम बंद आहे. आता ठेकेदार फक्त पावसाचा बहाणा करत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.