Nagpur
Nagpur Tendernama
विदर्भ

नागपुरातील ८० फुटांचा 'हा' रस्ता झाला ६० फुटांचा; गौडबंगाल काय?

टेंडरनामा ब्युरो

नागपूर (Nagpur) : झपाट्‍याने विस्तार होत असलेल्या नागपूरमधील बेसा-घोगली परिसरातील ८० फुटांचा मंजूर रस्ता ६० फुटांचा झाला आहे. भाजपच्या एका माजी मंत्र्यांच्या नातेवाईकाला या रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे कंत्राट देण्यात आले असल्याने याबाबत कोणी उघडपणे बोलण्यास तयार नाही.

बेसा-घोगली भाग झपाट्याने विकसित होत आहे. नवे नागपूरच या भागात वसले आहे. मोठ मोठ्या इमारती येथे निर्माण झाल्या आहेत. बेसा चौकापासून तर थेट वेळाहरीपर्यंतचे क्षेत्र आता व्यापले गेले आहे. त्यामुळे वर्दळसुद्धा वाढली आहे. अलीकडेच वाहनांच्या धडकेत दोघांचा मृत्यू झाला. पोद्दार शाळेची स्कूल व्हॅन उलटली होती. त्यात १४ विद्यार्थी होते. सुदैवाने या अपघातात कुठलीही प्राणहानी झाली नाही. या परिसरात निर्माण होणाऱ्या टाऊनशिपमुळे लोकसंख्या वाढतच जाणार आहे. त्यामुळे वाहतुकीची वर्दळ आणखी वाढणार आहे. भविष्यात होणारे भीषण अपघात टाळण्यासाठी बेसा ते घोगली सिमेंट रोडवर दुभाजक टाकणे सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक असल्याचे येथील नागरिकांचे म्हणणे आहे.

अद्यापही रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे काम सुरू आहे. काँक्रिटीकरणामुळे रस्ता उंच झाला आहे. दोन्ही बाजूला असलेली मोकळी जागा तशीच सोडून देण्यात आला आली. त्यामुळे खोली निर्माण झाली आहे. या कारणामुळेसुद्धा अपघाताचा धोका वाढला आहे.