Nagpur Municipal Corporation
Nagpur Municipal Corporation Tendernama
विदर्भ

जाहिरात एजन्सींनी 'असा' लावला नागपूर मनपाला 11 कोटींना चुना

टेंडरनामा ब्युरो

नागपूर (Nagpur) ः नागपूर शहरात (Nagpur City) विविध ठिकाणी एजन्सीने शुल्क न भरता लावलेले होर्डिंग्सवर महापालिकेने आजपासून कारवाईस सुरवात केली. नरेंद्रनगर येथील 'यश' (वायएएसएच) कंपनीचे तीन होर्डींग्ज काढण्यात आले. कंपनीकडे साडेचार कोटींची थकबाकी आहे. एकूण २२ एजन्सीकडे ११ कोटी रुपये थकीत आहेत.

महापालिकेच्या कारवाईनंतर कंपनीकडून थकबाकी भरण्याची तयारी दाखवण्यात आल्याची माहिती आहे. मात्र, असे असले तरी अवैधपणे लावण्यात आलेल्या होर्डींग्जवर कारवाई सुरूच राहणार असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे. शहरात मोठ्या प्रमाणात विविध कंपन्याचे जाहिर फलक असून त्यांनी फलकासाठी असलेली थकित रक्कम गेल्या अनेक दिवसांपासून भरलेली नाही. वाएएचएच या कंपनीकडे साडेचार कोटी रुपये थकित असताना त्यांना नोटीस देण्यात आली होती. या कंपनीचे शहरातील विविध भागात जाहिरात फलक लावण्यात आले आहे. नरेंद्रनगर भागातील तीन जाहिरात फलकावर गुरुवारी कारवाई करण्यात आली असून ते बुलडोझरच्या सहाय्याने तोडण्यात आले.

कंपनीने साडेचार कोटी रुपये तात्काळ भरले नाही तर शहरातील अन्य भागातील कंपनीच्या जाहिरात फलकांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे मालमत्ता कर विभागाचे प्रमुख आणि उपायुक्त (महसूल) मिलिंद मेश्राम यांनी सांगितले. शहरात आता ही कारवाई दररोज सुरू राहील. त्यामुळे ज्या जाहिरात कंपन्यांनी थकबाकी भरलेली नाही व अनाधिकृतपणे फलक लावले आहेत, त्यांनी ते तत्काळ न काढल्यास कारवाई करण्यात येणार असल्याचेही मेश्राम यांनी स्पष्ट केले.