Nanar Refinery Project
Nanar Refinery Project Tendernama
विदर्भ

1 लाख कोटींच्या 'या' प्रकल्पावरून नागपूर-चंद्रपूरमध्ये जुंपणार

टेंडरनामा ब्युरो

नागपूर (Nagpur) : नाणार येथे प्रस्तावित असलेल्या पेट्रोकेमिकल रिफायनरीचे तीन तुकडे करून एक प्रकल्प चंद्रपूर (Chandrapur) जिल्ह्यात स्थापन करण्याचे संकेत केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी केले असले तरी विदर्भ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट काउंसिलच्या - Vidarbha Economic Development Council (वेद) पदाधिकाऱ्यांच्या मते नागपूरमधील (Nagpur) बुटीबोरी एमआयडी किंवा कुही हीच जागा यासाठी सर्वाधिक योग्य आहे. तसा दावा पत्रकार परिषदेत वेदच्या प्रतिनिधींनी केला. मात्र यावेळी चंद्रपूरला आमचा विरोध नसल्याचेही स्पष्ट केले.

वेदमार्फत १० वर्षांपासून सातत्याने या प्रकल्पासाठी पाठपुरावा केला जात आहे. रत्नागिरीत प्रकल्पाला शिवसेनेचा विरोध आहेत. त्यामुळे हा प्रकल्प विदर्भात आणावा यासाठी प्रयत्न केले जात आहेत. हरदीपसिंग पुरी यांच्या संकतेमुळे वैदर्भीयांच्या आशा उंचावल्या आहेत. वेदच्या प्रतिनिधींनी पुरी यांची चंद्रपूर येथे जाऊन भेट घेतली. त्यांना या प्रकल्पाचे प्रेझेंटेशन दाखविले. हा प्रकल्प विदर्भात किती व्हायेबल आहे आणि विदर्भाच्या विकासासाठी किती महत्त्‍वाचा आहे हे सुद्धा पटवून दिले. विदर्भात उपलब्ध जमीन, पाणी, विजेची उपलब्धता याची माहिती त्यांना देण्यात आली. खारे पाणी गोडे करण्यात येणारा खर्च, अलीकडे समुद्र तटावर वाढलेले नैसर्गिक धोके याकडेही पेट्रोलियम मंत्र्यांचे लक्ष वेधले.

भौगोलिकदृष्ट्या मध्यवर्ती स्थान, राष्ट्रीय सुरक्षा, रेल्वे व विमानतळाची सुविधा, गोसेखुर्दचे पाणी, समृद्धी महामार्ग, जवळच असलेला ड्रायपोर्ट आणि उपलब्ध असलेली जागा याचा विचार करता नागपूर या प्रकल्पासाठी सर्वाधिक योग्य असल्याचे वेदच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. वेदचे प्रतिनिधींकडे प्रकल्पाचा फिजिबिलिटी रिपोर्टसुद्धा तयार केला आहे. तोसुद्धा लवकरच पेट्रोलियम विभागाच्या सचिवांना सादर केला जाणार आहे.

एकूण प्रकल्प तीन लाख कोटी रुपयांचा आहे. तीन तुकडे केल्यानंतर एक लाख कोटींची गुंतवणूक विदर्भात होईल. त्या माध्यमातून अनेक छोटोमोठे उद्योग येतील सोबतच रोजगारही उपलब्ध होणार आहे. हा प्रकल्प विदर्भात यावा यासाठी आम्ही पुरेपूर प्रयत्न करणार आहोत, असेही वेदच्या प्रतिनिधींनी सांगितले. पत्रकार परिषदेला वेदचे देवेंद्र पारेख, प्रदीप माहेश्वरी, साळवे, शिवकुमार राव आदी उपस्थित होते.