Trimbakeshwar
Trimbakeshwar Tendernama
उत्तर महाराष्ट्र

त्र्यंबकेश्वरातील अहल्या पात्रावरील पुलाला का होतोय विरोध?

टेंडरनामा ब्युरो

नाशिक (Nashik) : त्र्यंबकेश्वरलगत ब्रह्मगिरीच्या पायथ्याला अहल्या नदीपात्रात खासगी जागेवर नगरपालिका रस्ता व पुलाचे बांधकाम करीत आहे. ही जागा नया उदासीन आखाड्याची असून त्याविरोधात त्यांनी तक्रार करूनही दखल घेतली नाही, तसेच हरित लवादाच्या आदेशाची पायमल्ली केली जात आहे. ब्रह्मगिरी हा पर्यावरणीय दृष्ट्या संवेदनशील भाग असून, जिल्हाधिकारी डी. गंगाधरन यांनी याबाबत तातडीने बैठक बोलावली आहे.

त्र्यंबकेश्वर हे 12 ज्योतिर्लिंगपैकी एक प्रमुख तीर्थक्षेत्र आहे. या गावाच्या तीन बाजूनी ब्रह्मगिरी पर्वत रांग आहे. सिंहस्थ कुंभमेळा ठिकाण असल्याने शहरात मठ, मंदिर, धर्मशाळा, आश्रम यांचे बांधकाम सुरू असते. तसेच हॉटेल, लॉज, रिसॉर्टसाठीही विकासक, बिल्डर्स यांच्याकडून बांधकामे केली जातात. पालिका हद्दीतील जागा संपल्याने आता यांनी ब्रह्मगिरी पर्वताकडे मोर्चा वळवला आहे. गंगाद्वार मार्गावर अगदी उंचापर्यंत बांधकामे होऊन पर्वतावरील झाडी वेगाने कमी होत असतानाच ब्रह्मगिरी पर्वतावर जाण्याच्या मार्गाच्या खालच्या भागातील दाट वनराईकडे जाण्यासाठी पालिकेने खासगी जागेतून रस्ता तयार केला आहे. या रस्त्यात अहल्या नदीपात्र येत असल्याने सध्या या नदीपात्रावर पूल तयार करण्याचे काम सुरू आहे. या रस्त्याबाबत काही पर्यावरवादी कार्यकर्त्यांनी, तसेच नया उदासीन आखाड्याने विरोध केला असूनही पालिकेने बांधकाम रेटून नेण्याची भूमिका घेतली आहे.

पर्यावरणवाद्यांचे म्हणणे

- कालिका मंदिराकडे वर्षातून काही वेळा व गावातील ठराविक लोक जातात, त्यामुळे तेथे रस्ता, पूल उभारून संवेदनशील भागात खोदकाम करण्याची गरज नाही.

- हा भाग पर्यावरणीय दृष्ट्या संवेदनशील असून एकदा रस्ता झाल्यास तेथे बांधकामे वाढून ब्रह्मागिरीच्या अस्तित्वाला धोका निर्माण होऊ शकतो. 

- ज्या ठिकाणी एकही माणूस राहत नाही, तेथे जाण्यासाठी पालिका कोट्यवधींचा खर्च का करीत आहे?

- काही बाहेरच्या लोकांनी तेथे जमिनी घेतल्या असून, त्या जागांवर रिसॉर्ट, बंगले, फार्म हाऊस उभारायचे आहेत, यासाठी पालिका त्यांना मदत करीत आहे, पण त्याने ब्रह्मगिरी पर्वताला धोका निर्माण होणार आहे. 

पालिका म्हणते...

कालिका मंदिराकडे जाणारा रस्ता खासगी जागेतून असला तरी वाहिवाटीचा असल्याने पालिकेने तो केला आहे. तसेच पुलाचे काम पालिकेच्या हद्दीत सुरू आहे. नगरपालिकेच्या सभेत केलेल्या ठरावानुसार बांधकाम सुरू आहे, असा पालिकेचा दावा आहे.