नाशिक (Nashik): रेल्वे मंत्रालयाने कसारा ते मनमाड दरम्यान १३१ किलोमीटरचा समांतर रेल्वेमार्ग उभारण्यासाठी हिरवा कंदील दिला आहे.
या नव्या रेल्वे मार्गात कसारा घाटात दोन नवीन मार्ग टाकण्यात येणार आहे. यामुळे अनेक वर्षांपासून रखडलेला कल्याण-नाशिक लोकल रेल्वे गाडीचा प्रकल्प मार्गी लागू शकणार आहे. तसेच मुंबई-नाशिक दरम्यानचा रेल्वे प्रवास अधिक गतिमान होऊ शकणार आहे. या १३१ किलोमीटरच्या प्रकल्पासाठी अंदाजे साडेचार हजार कोटींचा खर्च अपेक्षित आहे.
मध्य रेल्वेचा मुंबई ते भुसावळ हा सर्वाधिक वर्दळीचा मार्ग आहे. या मार्गावरील कसारा घाटामुळे रेल्वे गाड्यांचा वेग मंदावतो तसेच या मार्गावर रेल्वे गाड्यांची संख्या वाढवण्यावर मर्यादा येतात. या पार्श्वभूमीवर रेल्वे मंत्रालयाकडून कल्याण ते कसारा, तसेच मनमाड ते भुसावळ तिसऱ्या व चौथ्या मार्गिकचे काम सुरू आहे. केवळ कसारा ते मनमाड हाच टप्पा बाकी होता. या मार्गावरील वाढता ताण हलका करण्यासाठी कसारा ते मनमाड असा १३१ किलोमीटरचा नवीन समांतर रेल्वेमार्ग उभारला जाणार आहे.
रेल्वे मंत्रालयाने प्रस्तावित मार्गाला मंजुरी दिली असून, नवीन रेल्वेमार्ग इगतपुरी, नाशिक, निफाड, चांदवड व नांदगाव या तालुक्यांतून जाणार आहे. प्रकल्पासाठी आवश्यक जमीन संपादनासाठी शासनाने राजपत्र जाहीर केले आहे. लवकरच सविस्तर अधिसूचना घोषित केली जाणार आहे.
कसारा घाटात १८ बोगदे
रेल्वे मंत्रालयातर्फे कसारा घाटात नव्याने दोन रेल्वेलाइन टाकण्यात येतील. प्राथमिक आराखड्यानुसार या मार्गावर १८ बोगदे असतील. तसेच घाटातील चढाईची (ग्रेडीयंट) उंची कमी होणार असल्याने विनाबँकर (इंजिन) रेल्वे कसारा घाट पार करतील. त्यामुळे मेल-एक्स्प्रेस रेल्वेगाड्यांचा वेग वाढणार आहे. तर कल्याण-नाशिक लोकलसेवा सुरू करण्यासाठी प्रस्तावित मार्ग फायदेशीर ठरेल. त्यामुळे नाशिककरांचे लोकलचे स्वप्न सत्यात उत्तरणार आहे.
या गावांमध्ये होणार भूसंपादन
निफाड : चितेगाव, नारायणगाव, चांदोरी, औणे, मौजे सुकेणे, कसबे सुकेणे, पिंपळस, पिंपरी, निफाड, गीलाकुंज, शिवडी, उगाव, थेटले, कोटमगाव, टाकळी विंचूर, पिंपळगाव (नि.)
नाशिक : भगूर (एमसीआय), वंजारवाडी, लोहशिंगवे, लहवीत, संसरी, बेलतगव्हाण, विहितगाव, देवळाली, पंचक, एकलहरे, माडसांगवी, शिलापूर, ओढा, लाखलगाव, सिद्ध पिंप्री
चांदवड : ताकी खु., वाहेगावसाळ, काळखोडे, तळेगाव रुई, रायपूर, वडगाव पंगू, रापली
इगतपुरी : माणिक खांब, नांदगाव बु., बोरटेंभे, नांदूरवैद्य
भूसंपादनासाठी अधिकारी नियुक्त
प्रस्तावित रेल्वेमार्गासाठी तातडीने भू-संपादन करण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्याची नियुक्ती केली आहे. रेल्वेने मोजणी शुल्क भरल्यानंतर संयुक्त मोजणीची प्रक्रिया सुरू होईल