Samruddhi Mahamarg
Samruddhi Mahamarg Tendernama
उत्तर महाराष्ट्र

साहेब, तुम्हीच सांगा, समृद्धी महामार्गाचा अंडरपास ओलांडायचा कसा?

टेंडरनामा ब्युरो

नाशिक (Nashik) : समृद्धी महामार्ग हा महाकाय प्रकल्प असून, त्याबाबत अनेक मोठमोठ्या गोष्टी सांगितल्या जातात. मात्र, या प्रकल्पामुळे महामार्गालगतच्या नागरिकांना तेवढ्याच मोठ्या समस्यांचा सामना करावा लागत आहेत. महामार्गावरील पावसाचे पाणी शेतकऱ्यांच्या शेतात सोडून देण्याचा प्रश्न कायम असतानाच महामार्गाच्या अंडर पासमधील पाण्यातून कसे जायचे, अशी नवी समस्या समोर आली आहे. (Mumbai - Nagpur Samruddhi Mahamarg)

मुंबई-नागपूर हा 710 किमी लांबीचा व 120 मीटर रुंदीचा समृद्धी महामार्ग आहे. या महामार्गामुळे मुंबई - नागपूर अंतर सात तासांत कापता येणार आहे. हा प्रकल्प विदर्भ व मराठवाडा यांच्या प्रगतीसाठी महत्त्वाची भूमिका निभावणार आहे, आदी अनेक वैशिष्ट्ये असलेला समृद्धी महामार्ग पूर्णत्वाकडे जात आहे. नागपूर ते शिर्डी दरम्यानचा मार्ग लवकरच वाहतुकीसाठी खुला होणार आहे. मात्र, प्रकल्प जसा पूर्णत्वाकडे जात आहे, तसतसा लगतच्या नागरिकांना त्याच्यातील त्रुटींचा त्रास जाणवू लागला आहे.

महामार्गावर पडणारे पावसाचे पाणी थेट शेजारच्या शेतात सोडून दिले जात आहे. यामुळे शेतात पाणी साचून पिकांचे नुकसान होत असतानाच आता अंडरपासची नवी समस्या समोर आली आहे. समृद्धी महामार्गाची रुंदी साधारण 100 मीटर आहे. साधारणपणे दोन ते तीन किमी अंतरावर नागरिकांना महामार्ग ओलांडून जाण्यासाठी अंडरपास तयार करण्यात आले आहेत. अंडरपासला जोडणारे रस्ते नेमके या महामार्गजवळ सखल झाले आहेत. यामुळे पावसाचे पाणी रस्त्यावरून वाहत अंडरपासमध्ये जमा होते. तसेच बऱ्याच ठिकाणी समृद्धी महामार्ग तयार करणाऱ्या कंपन्यांनी लगतच्या रस्त्यांचा वापर केला, पण त्यांच्या देखभालीची जबादारी घेतली नाही. यामुळे अंडरपासखाली या रस्त्यांवर खड्डे असून त्या सखल भागात पावसाचे पाणी साचून राहते. तसेच महामार्ग तयार करताना 100 मीटर बोगद्यामुळे अंधार होऊ नये म्हणून मध्यभाग उघडा ठेवला आहे. त्या उघड्या भागातून पावसाचे पाणी अंडर पासमध्ये साचते.

नागरिक 100 मीटरचा अंडर पास ओलांडत असताना समोरून येणाऱ्या वाहनांमुळे त्यांच्या अंगावर चिखलाचे पाणी उडते, बऱ्याचदा गुडघाभर चिखलातून अंडर पास ओलांडावा लागतो. एकदा पाऊस पडल्यावर पुढील दहा - बारा दिवस नागरिकांना हा त्रास सहन करावा लागतो. एरवी रस्त्यावर खड्डे झाल्यास नागरिक थोडासा वळसा घालून जातात. मात्र, अंडरपासमधून जाण्याशिवाय काहीही पर्याय नाही. समृद्धी महामार्गावर चढता येत नाही. यामुळे महामार्गाच्या पलीकडे जाण्यासाठी अंडर पासमधून जाण्याशिवाय पर्याय नसल्याने नागरिक अक्षरशः चिखलातून प्रवास करीत आहेत. काही ठिकाणी विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी अंडरपास ओलांडावा लागतो. त्यामुळे विद्यार्थी अंडरपास मधून जात असताना त्यांच्या अंगावर चिखल उडतो.

रस्त्याची उंची वाढविण्याची मागणी
अंडरपासमधील रस्ता सखल असल्यामुळे, तसेच त्याचे डांबरीकरण उखडले असल्यामुळे अंडरपासमध्ये पाणी साचून राहते. यामुळे या रस्त्यांची दुरुस्ती करून त्यांची उंची वाढवावी म्हणजे पावसाचे पाणी अंडर पास बाहेर पडेल व तेथे साचून राहणार नाही, असे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे.