Mahagenco Tendernama
उत्तर महाराष्ट्र

सिन्नरच्या इंडियाबुल्स सेझचा तिढा अखेर सुटला; एनटीपीसी-महाजनकोने मारली बाजी

१३५० मेगावॉट वीज प्रकल्प सिन्नर थर्मल पॉवर लिमिटेड (STPL) पुन्हा सुरू होणार

टेंडरनामा ब्युरो

नाशिक (Nashik): पूर्वीच्या इंडिया बुल्स व आताच्या रतन इंडिया या कंपनीचा दिवाळखोरीत गेलेला सिन्नर थर्मल पॉवर लिमिटेड (STPL) प्रकल्पाच्या पुनरुज्जीवनाला दीर्घ प्रतिक्षेनंतर गती मिळाली आहे.

एनटीपीसी आणि महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनी (महाजनको) यांनी संयुक्तरीत्या सादर केलेल्या रिझोल्यूशन प्लॅनला नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल (NCLT) ने २८ नोव्हेंबर रोजी अधिकृत मंजुरी दिली. यामुळे १३५० मेगावॅट क्षमतेचा हा मोठा औष्णिक प्रकल्प पुन्हा सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. हा प्रकल्प महाजननकोकडे या सरकारी कंपनीकडे हस्तांतरित व्हावा, यासाठी खासदार राजाभाऊ वाजे आग्रही होते.

राज्य शासनाने महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या माध्यमातून मुसळगावच्या शेतकऱ्यांकडून ४१८.०२ हेक्टर व गुळवंचच्या शेतकऱ्यांकडून ९७६.१५ हेक्टर क्षेत्र एमआयडीसीने २००६ मध्ये खरेदी केले होते. त्यातील पंधरा टक्के विकसित भूखंड जमीन धारकांना परत केल्यानंतर शासनाने उर्वरित ९०० हेक्टर भूखंड  एमआयडीसीच्या माध्यमातून इंडियाबुल्सला भाडेतत्वावर दिली आहे. या जागेवर औष्णिक वीज निर्मिती प्रकल्प उभारण्यात आला. मात्र, तेथे कोळसा पुरवठा करण्यासाठी रेल्वे सुविधा नसल्याने २७० मेगावॅट प्रकल्पाची  केवळ चाचणी होऊन तो २०१५ पासून बंद आहे.

हा प्रकल्प २०२० पासून आर्थिक संकटात असल्याचे अधिकृत जाहीर करण्यात आले. रतन इंडिया ही कंपनी दिवाळखोरीत निघाल्याने या कंपनीची प्रमुख कर्जदार वित्तीय संस्था पॉवर फायनान्स कॉर्पोरेशनने नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनलकडे दावा दाखल केला.

दरम्यान महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने इंडियाबुल्सला सेझसाठी दिलेल्या ९०० हेक्टर जमिनीपैकी पडून असलेल्या ५१२ हेक्टर जमिनीचे मे २०२४ मध्ये हस्तांतरण केले. मात्र, त्याविरोधात कंपनी न्यायालयात गेली आहे. 

या प्रकल्पावर सुमारे १६ हजार कोटींचे कर्ज असून  ज्यात पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन (PFC) चे ३,००० कोटी रुपयांचे कर्ज आहे.

रतन इंडिया ने २०२० मध्ये दिवाळखोरी जाहीर  केल्यानंतर ऑक्टोबर   २०२कॉर्पोरेशनने दिवाळखोरी लवादात (nclt) याचिका दाखल केल्यानंतर जानेवारी २०२४ मध्ये यामध्ये प्रकल्प विक्रीची प्रक्रिया सुरू झाली. त्यात हा प्रकल्प घेण्यास १५ कंपन्यांनी प्रस्ताव दाखल केले त्यात अडाणी पॉवर लिमिटेड, जिंदाल पॉवर लिमिटेड, वेदांता ग्रुप, ओरिसा मेटालिक्स व्हीएफएस आय (VFS)I होल्डिंग्स प्रा. लि., जेएसडब्ल्यू एनर्जी, टॉरेंट पॉवर, एनटीपीसी (संयुक्त बोली महाजनको सोबत). यांनी भाग घेतला. लिलाव प्रक्रियेत महाजनको–एनटीपीसी कंसोर्टियमने तब्बल साडेतीन हजार कोटींहून अधिक बोली लावून सर्वाधिक पात्र बोलीदार म्हणून आघाडी घेतली.

सिन्नर तालुक्यातील गुळवंच व मुसळगाव शिवारात मंजूर असलेला व सध्या अर्धवट उभारलेला हा १३५० मेगावॅटचा मोठा प्रकल्प पुन्हा सुरू झाल्यास स्थानिक तरुणांना मोठ्या प्रमाणावर रोजगार संधी, औद्योगिक वसाहतींना स्थिर वीजपुरवठा होऊ शकणार आहे. तसेच या सेझमधील उर्वरित ५१२ हेक्टर भूखंडावर नवीन उद्योग येऊन गुंतवणुकीला नवी गती मिळणार आहे. महाजनको आणि एनटीपीसी (NTPC) या दोन्ही कंपन्यांचा मोठ्या प्रकल्पांच्या निर्मिती व व्यवस्थापनातील कौशल्याचा अनुभव लक्षात घेता, सिन्नर थर्मल पॉवर लिमिटेड ( STPL) च्या पुनरुज्जीवनाला अपेक्षित वेग प्राप्त होऊन सिन्नरमधील औद्योगिक विकासाला गती मिळणार आहे.