Nashik
Nashik Tendernama
उत्तर महाराष्ट्र

'ठेकेदाराला डोळ्यासमोर ठेवून अटीशर्ती बदलल्याने ते टेंडर रद्द करा'

टेंडरनामा ब्युरो

नाशिक (Nashik) : विशिष्ट ठेकेदाराला डोळ्यासमोर ठेवून अटी व शर्तींमध्ये परस्पर बदल करण्यात आल्याने पेस्ट कंट्रोलचे टेंडर रद्द करावे, अशी भूमिका शिवसेनेने घेतली आहे. शिवसेनेचे महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांनी महापालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांना याबाबत निवेदन दिले आहे.

नाशिक शहरात धूर फवारणी तसेच सार्वजनिक ठिकाणी औषध फवारणीसाठी महापालिकेच्यावतीने पेस्ट कंट्रोल टेंडर प्रसिद्ध केले आहे. या टेंडरमध्ये कामाची रक्कम वाढवण्यात आली आहे. तसेच विशिष्ट ठेकेदारांना डोळ्यासमोर ठेवून अटी व शर्ती टाकण्यात आल्या आहेत. यामुळे केंद्रीय दक्षता समितीच्या मार्गदर्शक सूचनांचे उल्लंघन झाल्याचा दावा बडगुजर यांनी केला आहे. टेंडरच्या अटी क्रमांक एक व दोन मधील सात क्रमांकावर काम मिळालेल्या ठेकेदाराने महापालिका हद्दीतील 30 ते 40 किलोमीटर क्षेत्रात काम केल्याचा अनुभव असावा, अशी अट टाकली आहे. प्रत्यक्षात, केंद्रीय दक्षता समितीने 100 किलोमीटर क्षेत्राचे अट बंधनकारक केली आहे. या टेंडरमध्ये किलोमीटरची अट कमी करण्यात आल्याने महापालिकेच्या जीवशास्त्रज्ञ विभागाच्या भूमिकेवर संशय व्यक्त करण्यात आला आहे.

त्याचबरोबर ठेक्याच्या एकूण रकमेच्या 80 टक्के किमतीचे एक काम व 50 टक्के किमतीची दोन कामे तसेच 40 टक्के क्षमतेच्या तीन कामांचा अनुभव असावा अशी अट आहे. मात्र, या टेंडरमध्ये ती अट देखील रद्द करण्यात आली आहे. यावरून विशिष्ट ठेकेदाराला डोळ्यासमोर ठेवून अटी व शर्ती कमी करण्यात आल्याचा आरोप बडगुजर यांनी केला आहे. केंद्रीय दक्षता समितीने कमीत कमी सात वर्षाचा अनुभव असावा अशी अट टाकली आहे. मात्र, महापालिकेने टेंडर प्रक्रियेत ती अट दहा वर्ष दर्शविल्याने या सूचनेचे उल्लंघन झाल्याचे त्यांनी म्हटले आहे. केंद्रीय दक्षता समितीच्या मार्गदर्शक सूचनानुसार ऑडिटेड बॅलन्स शीट मध्ये तीन वर्षाची उलाढाल 30 टक्के आवश्यक आहे. मात्र, टेंडर प्रक्रियेत वार्षिक उलाढाल 5.80 कोटी दाखविण्यात आली आहे. यावरून हे बदल ठेकेदाराच्या सांगण्यानुसार करण्यात आल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.

केंद्रीय दक्षता समितीच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन पेस्ट कंट्रोलच्या निविदा प्रक्रियेत करणे गरजेचे होते परंतु अटी व शर्ती अचानक बदलण्यात आल्याने सदरची प्रक्रिया रद्द करण्याबरोबरच संबंधित अधिकाऱ्यांवर फौजदारी प्रकारची कारवाई करावी.

- सुधाकर बडगुजर, महानगरप्रमुख, शिवसेना