Nashik Municipal Corporation.
Nashik Municipal Corporation. Tendernama
उत्तर महाराष्ट्र

नाशिक मनपाच्या 'या' बंद पडलेल्या प्रकल्पाचे होणार पुनरुज्जीवन

टेंडरनामा ब्युरो

नाशिक (Nashik) : नाशिक महापालिकेचा बंद पडलेला वेस्ट टू एनर्जी अर्थात कचऱ्यापासून वीज निर्मिती प्रकल्प चालवण्याची तयारी महात्मा फुले नविनीकरणीय ऊर्जा पायाभूत प्राद्योगिक (महाप्रीत) या संस्थेने चालवण्याची तयारी दर्शवली आहे. यामुळे महापालिकेने महाप्रीतकडे खत प्रकल्पातील ट्रेनिंग सेंटर व शहरातील इलेक्ट्रिक चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर उभारण्याचेही काम महाप्रीतला देण्याचा निर्णय घेतला आहे.

नाशिक महापालिकने पाथर्डी शिवारात कचऱ्यापासून वीज निर्मिती करण्याचा अर्थात वेस्ट एनर्जी प्रकल्प उभारला आहे. या प्रकल्पातून एक मेगावॅट वीजनिर्मिती करण्यासाठी अपेक्षित कच्चा माल न मिळाल्याने व महापालिकेच्या यांत्रिकी विभागाकडून साहाय्य न मिळाल्याने या प्रकल्पातून अपेक्षित वीज निर्मिती होऊ शकली नाही. ठेकेदार व महापालिकेचा वाद लवादाकडे पोहोचला. परिणामी सध्या वेस्ट एनर्जी प्रकल्प बंद अवस्थेत आहे. त्यामुळे महापालिकेने कचऱ्यापासून वीजनिर्मिती प्रकल्प पूर्ण क्षमतने चालवण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी महाप्रीतचे अध्यक्ष बिपिन श्रीमाळी यांच्यासोबत महापालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी मुख्यालयात बैठक घेतली. यावेळी कार्यकारी संचालक रवींद्र चव्हाण, जनरल मॅनेजर उमाकांत धामणकर, अतिरिक्त आयुक्त अर्चना तांबे, उपायुक्त मनोज घोडे- पाटील, शहर अभियंता शिवकुमार वंजारी, अधीक्षक अभियंता उदय धर्माधिकारी, शाखा अभियंता सुनील खैरनार, आयटी विभागाचे प्रमुख नरेंद्र धामणे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी नरेंद्र महाजन आदी पउस्थित होते.

महाप्रीत केंद्र सरकारची सहभागी कंपनी असून, ऊर्जा बचत सौरऊर्जा प्रकल्प इलेक्ट्रिक वाहने व चार्जिंग स्टेशन प्रकल्प, प्रदूषण नियंत्रण या विषयांवर संस्थेमार्फत कामे होतात. ठाणे, नागपूर, पुणे, औरंगाबाद येथे कंपनीचे प्रकल्प सुरू आहे. नाशिक शहरासाठी दोन प्रकल्प उभारण्याची तयारी कंपनीने दाखवली. यात इलेक्ट्रिक व्हेईकल चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी सरकारकडून निधी उपलब्ध करून देण्याची तयारी दाखवण्यात आली. त्याचबरोबर वेस्ट टू एनर्जी प्रकल्प व महापालिकेचे वॉटर ट्रीटमेंट प्लांट सोलर तंत्रज्ञानावर विकसित करण्याचा मनोदय व्यक्त केला आहे.