Nashik
Nashik Tendernama
उत्तर महाराष्ट्र

'या' नदीजोड प्रकल्पाच्या मदतीला धावला पाऊस अन् मग...

टेंडरनामा ब्युरो

नाशिक (Nashik) : सिन्नर तालुक्यातील पूर्व भागासाठी वरदान ठरणाऱ्या कुंदेवाडी-खोपडी-मिरगाव व कुंदेवाडी- सायाळे या बंदिस्त पाईपलाईनद्वारे देव-जाम नदीजोड प्रकल्पाची चाचणी बुधवारी रात्री झालेल्या धुवाधार पावसामुळे यशस्वी झाली आहे. या प्रकल्पाची चाचणी ठेकेदाराने लांबविली असली तरी पाऊस मात्र मदतीला धावून आला.

सिन्नर हा दुष्काळी तालुका असून या संपूर्ण तालुक्यात केवळ देव व जाम या दोन नद्या आहेत. त्यात देवनदीचा उगम सिन्नरच्या पाश्चिम भागातील धोंडबारच्या डोंगरात होत असल्याने पावसाळ्यात देवनदी दुथडी भरून वाहत असते. समन्याय पाणी वाटप कायद्यामुळे देवनदीवर 5 दलघफु पेक्षा मोठे बंधारे बांधता येत नाही. यामुळे देवनदीवर अनेक बंधारे बंधूनही प्रत्येक पावसाळ्यात देवनदीतून पाणी गोदावरीत वाहून जाते. जाम नदी मुळात दुष्काळी भागात उगम पावत असल्याने या नदीवरील बंधारे कधीतरी पाण्याने भरतात. यामुळे देवनदीचे अतिरिक्त पाणी जाम नदीत टाकल्यास या पूर पाण्याने सिन्नरच्या पूर्वभागातील सर्व नदी नाल्यांवरील बंधारे भरून तेथील सिंचन व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होईल, या हेतूने 2012 मध्ये कुंदेवाडी-सायाळे व कुंदेवाडी -खोपडी- मिरगाव या दोन योजना मंजूर करण्यात आल्या.

सुरुवातीला पुरचाऱ्या करून त्याद्वारे हे पाणी पूर्वभागात नेण्याचे नियोजन होते. मात्र, भूसंपादन आणि पाणी वहनामुळे होणारी तूट विचारात घेऊन बंदिस्त पाईपद्वारे ही नदी जोड योजना राबविण्याचे नियोजन करण्यात आले. या योजनेच्या कामाचे 2019 मध्ये उदघाटन झाले. त्यानुसार कुंदेवाडी सायाळे ही 35 किमी व कुंदेवाडी-मिरगाव या 32 किमी योजना साकारल्या जात आहेत. ठेकेदाराकडून संथ गतीने काम करण्यात येत असल्याने तीन वर्षांत म्हणजे 2022 पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असताना प्रत्यक्षात कुंदेवाडी-सायाळे या योजनेचे केवळ 17 किमी काम झाले असून खोपडी मिरगाव योजनेचे सहा किमी काम झाले आहे. या दोन्ही योजना 200 कोटींच्या असून त्यांच्यामधून पूर्व भागाला जवळपास 250 दलघफु पाणी उपलब्ध होणार आहे. दरम्यान कुंदेवाडी -सायाळे योजनेचे १७ किमी काम झाले आहे. मात्र, केवळ गोंदनाल्यावरील दोनशे मीटर पाइप न जोडल्यामुळे सरकारचे ५० कोटी रुपये खर्च होऊनही देवनदीतून या बंदिस्त पाईप लाईनमधून पाणी सोडता येत नाही.

आतापर्यंत केवळ दातली येथील लघुपाटबंधारे प्रकल्प या पाण्याने भरला आहे. शेजारी देवनदी दुथडी भरून वाहत असूनही 8 किमीवरील गोंदनाला येथे 200 मीटर पाईपलाईन टाकली नाही, तसेच तेथील चेंबरची (पाणी विमोचक) कामे अपुरी असल्याने पाणी सोडता येत नाही. यामुळे या बंदिस्त पाईपलाईनद्वारे राबवल्या जाणाऱ्या नदीजोड प्रकल्पाची चाचणी पुढच्या वर्षी होणार असे वाटत असतानाच बुधवारी रात्री सिन्नर तालुक्यात झालेल्या प्रचंड पावसामुळे गोंदनाल्याला पूर येऊन तेथील बंधारा भरल्याने ते पाणी उघड्या असलेल्या पाईपलाईनमध्ये घुसून थेट 17 किमीवरील दोडी बुद्रुक येथील नाल्यातून बाहेर आले. तेथून ते सुरेगाव, पांगरी असे जाम नदीला मिळाले आहे. यामुळे ठेकेदाराने लांबवले तरी पावसानेच ही चाचणी केल्याची चर्चा आहे. आता तरी ठेकेदाराने वेळेवर व पावसाळा संपण्यापूर्वी पाईपलाईन टाकलेल्या ठिकाणी राहिलेली कामे पूर्ण करून देवनदीचे पाणी थेट जाम नदीत येऊ द्यावे, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.