Mumbai-Nashik
Mumbai-Nashik Tendernama
उत्तर महाराष्ट्र

नाशिक-मुंबई सहापदरीकरणासाठी ७०० कोटी; गडकरींच्या हस्ते भूमीपूजन

टेंडरनामा ब्युरो

नाशिक (Nashik) : नाशिकचे माजी पालकमंत्री छगन भुजबळ (Chagan Bhujbal) यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांना या महिन्यात पत्र पाठवून नाशिक ते मुंबई मार्गाचे कॉंक्रिटीकरण करण्याच्या त्यांच्या घोषणेची आठवण करून दिली होती. त्यानंतरी अवघ्या पंधरा दिवसांमध्ये खासदार हेमंत गोडसे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडून नाशिक-मुंबई दरम्यान गोंदे ते पिंप्रीसदो या २० किलोमीटरचे सहापदरीकरणाला मंजुरी मिळवली असून त्यासाठी ७०० कोटी रुपये मंजूर केले आहेत. दरम्यान या नवीन कामाचे भूमीपूजन १८ डिसेंबरला नितीन गडकरी यांच्या हस्ते भूमीपूजन होणार आहे.

मुंबई-आग्रा महामार्गावर नाशिक मुंबई दरम्यान या पावसाळ्यात प्रचंड खड्डे पडले. सलगपणे ऑक्टोबरपर्यंत चाललेल्या या पावसामुळे राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरणला या रस्त्यांची दुरुस्ती करण्यात अडथळे आले. यामुळे या नादरुस्त रस्त्यांमुळे वाहनधारकांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागले. एरवी नाशिक- मुंबई प्रवास तीन तासांच असताना या खड्ड्यांमुळे सहा तासांपेक्षा अधिक वेळ लागत असल्याने नागरिकांच्या भावना तिव्र होत्या. दरम्यान माजी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी या मार्गाची वेळेत दुरुस्ती न झाल्यास आंदोलनाचा इशारा दिला. तसेच पालकमंत्री दादा भुसे यांनीही संबंधित विभागाी बैठक घेत नोव्हेंबरच्या मध्यापर्यंत रस्ता दुरुस्तीच्या सूचना दिल्या होत्या. रस्ता दुरुस्तीचे काम अंतिम टप्प्यात असतानाच छगन भुजबळ यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना पत्र पाठवून त्यात गडकरी यांनी केलेल्या घोषणेची आठवण करून दिली. गडकरी यांनी ऑक्टोबर २०२१ मध्ये नाशिक ते वडपे या मार्ग सहापदी कॉंक्रिटीकरण करण्याची घोषणा केली होती. 

दरम्यान खासदार हेमंत गोडसे यांनी नाशिक ते मुंबई दरम्यानच्या मार्गावरील गोंदे ते पिंप्रीसदो या २० किलोमीटर मार्गाचे सहापदरीकरण करण्यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याकडून ७०० कोटी रुपये मंजूर केले आहेत. मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग नाशिक जिल्ह्यातून जात असताना मुंबई- आग्रा महामार्गाला पिंप्रीसदो येथे अगदी जवळून जातो. यामुळे मुंबई आग्रा महामार्गावरून समृद्धीवर जाण्यासाठी येथून जवळचा पर्याय असणार आहे. यामुळे या भागात मुंबई आग्रा महामार्गाचे सहापदरीकरण करण्यात येणार आहे. यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी निधी मंजूर केला असून १८ डिसेंबरला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते या सहापदरी मार्गाचे भूमीपूजन होणारी असल्याची माहिती खासदार हेमंत गोडसे यांनी दिली. नाशिक लोकसभा मतदारसंघात भाजप व बाळासाहेबांची शिवसेना या पक्षांमध्ये नेतृत्वाची पोकळी असून भुजबळांना पर्यायी नेतृत्व नसल्याची उणीव या पक्षांना भासत असते. यामुळे यापूर्वी भुजबळ यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव करणाऱ्या खासदार गोडसे यांनी नेतृत्वाची पोकळी भरून काढण्याचे प्रयत्न सुरू केले असून भुजबळांच्या मागणीनंतर पंधराच दिवसांत सहापदरी मार्गासाठी निधी मंजूर करून आणत त्यांनी कृतीतून प्रत्युत्तर दिल्याचे बोलले जात आहे.