water
water Tendernama
उत्तर महाराष्ट्र

Nashik ZP : 110 कोटींच्या मिशन भगिरथमुळे एकाच पावसात 467 दलघफू पाणीसाठा

टेंडरनामा ब्युरो

नाशिक (Nashik) : जिल्हा परिषदेच्या जलसंधारण विभागाने रोजगार हमी योजनेतून राबवलेल्या मिशन भगिरथमधून नुकतेच झालेल्या पावसात ४६७ दलघफू पाणीसाठा झाला आहे. जिल्हा परिषदेने या वर्षात रोजगार हमी योजनेतून ३६५ बंधारे मंजूर केले असून त्यातील १६३ बांधाऱ्यांची कामे पूर्ण झाली आहेत. या पूर्ण झालेल्या बंधाऱ्यांपैकी ५२ बंधाऱ्यांमध्ये मागील आठवड्यातील पावसामुळे  पाणीसाठा झाला आहे. जिल्हा परिषदेने रोजगार हमी योजनेतून ११० कोटींच्या या योजनेतून पहिल्याच वर्षी ४६७ दलघफू साठा झाला आहे.

नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अशिमा मित्तल यांच्या संकल्पनेतून जलसंधारणाची कामे करण्यासाठी मिशन भगिरथ ही योजना सुरू केली आहे. यातून गावांची निवड करून तेथे साखळी बंधारे प्रस्तावित केले असून यासाठी रोजगार हमी योजनेचा निधी वापरला जात आहे. जिल्हा परिषदेच्या जलसंधारण विभागाने केलेल्या आराखड्यानुसार १५ तालुक्यांमध्ये ६०९ बंधारे प्रस्तावित केले आहेत. यापैकी आतापर्यंत ३६५ बंधाऱ्यांच्या कामांना प्रशासकीय मान्यता देऊन कामे सुरू करण्यात आली आहेत. यापैकी १६३ बंधाऱ्यांची कामे पूर्ण झाली आहेत. यावर्षी पावसाने दडी मारल्यामुळे बंधारे बांधूनही त्यात साठा झालेला नाही. दरम्यान मागील आठवड्यात नाशिक जिल्हयातील पश्चिम पट्ट्यात मोठ्याप्रमाणावर पाऊस झाला. या पावसामुळे इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, दिंडोरी, पेठ, सुरगाणा, बागलाण, कळवण या तालुक्यांमधील ५२ बंधारे तुडुंब भरले आहेत. यामुळे जिल्ह्यात ४६७ दलघफू पाणीसाठी उपलब्ध झाला आहे. यामुळे स्थानिक शेतकऱ्यांना सिंचनासाठी याचा फायदा होणार आहे.

अडचणींवर मात
जिल्ह्यात रोजगार हमी योजनेतून अनेक वैयक्तिक लाभाच्या योजना तसेच ९०:१० प्रमाण असलेल्या सार्वजनिक कामांच्या योजनांची संख्या वाढल्यामुळे रोजगार हमी योजनेसाठी ठरवण्यात आलेले ६०:४० चे प्रमाण राखण्यात अडचणी येत असतानाच नाशिक जिल्हा परिषदेने मिशन भगिरथ ही जलसंधारणाची योजना तयार करून त्याची एप्रिलपासून अंमलबजावणी सुरू केली. मात्र, या योजनेतील कामांसाठी ९०:१० चे कुशल अकुशलचे प्रमाण ठरवण्यात आले. परिणामी जिल्ह्यातील कुशल अकुशलचे ६०: ४० चे प्रमाण बिघडले. यामुळे जिल्हाधिकारी, पालकमंत्री यांनी जिल्हा परिषदेला रोजगार हमी योजना राबवताना कुशल अकुशल प्रमाण राखण्याच्या सूचना दिल्या होत्या. जिल्हा परिषदेने यासाठी मजुरांची संख्य अधिक असणाऱ्या योजनांचा समावेश रोजगार हमी योजनेच्या पुरवणी आराखड्यांमध्ये करून ही योजना सुरूच ठेवली आहे.

रोजगार हमी योजनेतील ३६५ बंधाऱ्यांची कामे सुरू असून त्यापैकी १५२ कामे पूर्ण झाली आहेत. यावर्षी सुरवातीपासून पाऊस कमी असल्यामुळे कामे पूर्ण झालेल्या बंधाऱ्यांमध्ये पाणी आले नव्हते. मागील आठवड्यात झालेल्या पावसाने निर्माण झालेल्या पाणीसाठ्यामुळे लगतच्या शेतीला सिंचनासाठी उपयोगी पडणार आहे.
- डॉ. अर्जुन गुंडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प. नाशिक.