नाशिक (Nashik) : सप्तश्रृंगगड येथे वर्षभर भाविकांची वर्दळ असते. त्यामूळे तेथे तयार होणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी नाशिक जिल्हा परिषदेने सप्तशृंग गड येथे घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प उभारण्यास प्रशासकीय मान्यता दिली आहे. सप्तश्रृंगगड येथे घनकचरा व्यवस्थापनासाठी दीड कोटींचा आराखडा तयार केला असून, त्यासाठी पंधराव्या वित्त आयोग निधीतून यावर्षी 80 लाख रुपये मंजूर केले आहेत.
नाशिक जिल्हा परिषदेस यावर्षी पंधराव्या वित्त आयोगाचे 25 कोटी 12 लाख रुपये निधी प्राप्त झाला आहे. यापैकी 10 कोटी निधी अबंधीत असून प्रत्येकी 7.5 कोटी निधी हा पेयजल व स्वच्छतेसाठी खर्च करणे बंधनकारक आहे. ग्रामपंचायत विभागाने जिल्हा विकास आराखडा तयार करून त्यातील कामाची निवड करून त्यांना प्रशासकीय मान्यता दिल्या आहेत. यापैकी स्वच्छतेवर खर्च करण्याच्या बंधित निधीपैकी 80 लाख रुपये निधी सप्तशृंगगड येथील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पासाठी मंजूर केले आहेत. या प्रकल्पात प्रामुख्याने घन कचरा संकलन करणे, संकलित कचऱ्याचे ओला व सुखा कचरा असे विलगीकरण करून त्यावर प्रक्रिया करणे, बायोगॅस निर्मिती प्रकल्प उभारणे आदी कामांचा समावेश असल्याचे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी यांनी सांगितले.
सप्तश्रृंग गड ग्रामपंचायतची लोकसंख्या कमी आहे. तसेच भाविकांची संख्या लक्षात घेता, ग्रामपंचायतीला प्राप्त होणाऱ्या निधीतून भाविकांना सुविधा पुरवणे, स्वच्छता ठेवणे शक्य होत नाही. केंद्र सरकारने स्वच्छ भारत मिशन च्या टप्पा दोनमध्ये घन कचरा व्यवस्थापन प्रकल्प उभारण्यास प्रोत्साहन देण्याचे धोरण निश्चित केले आहे. यामुळे जिल्हा परिषदेने त्यांना प्राप्त झालेल्या पंधराव्या वित्त आयोगाच्या बंधित निधीतून सप्तश्रृंगगड येथे घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प प्रस्तावित केला आहे.