Nashik
Nashik Tendernama
उत्तर महाराष्ट्र

Nashik : नाशिक-पेठ रस्त्याची दुरुस्ती कधी? आणखी किती जणांचे मणके खिळखिळे होणार?

टेंडरनामा ब्युरो

नाशिक (Nashik) : नाशिक - पेठ (Nashik - Peth Road) या मार्गावर नाशिक महापालिका (NMC) हद्दीत राऊ हॉटेल ते तवली फाटा या जवळपास साडेतीन कोटी रुपये खर्च करून केलेल्या रस्त्याची पहिल्याच वर्षाच्या पावसाळ्यात दयनीय अवस्था झाली आहे. या रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले असून महापालिकेने या रस्त्याची दुरुस्ती करून काय मिळवले? आणखी किती नागरिकांचे मणके खिळखिळे झाल्यावर या रस्त्याची दुरुस्ती होणार आहे, अस प्रश्न नागरिक विचारत आहेत.

Nashik

यामुळे मागील वर्षी नागरिकांनी या रस्त्याच्या मजबुतीकरणासाठी आंदोलन केले होते. त्याची दखल घेऊन आमदार ॲड. राहुल ढिकले यांनी या रस्त्याचे स्मार्टसिटी कंपनीच्या माध्यमातून काँक्रिटिकरण करण्याचा प्रस्ताव मांडला. त्यासाठी महासभेची परवानगीही घेतली. मात्र, स्मार्ट सिटी कंपनीची नवीन कामे प्रस्तावित करण्याची मुदत संपली असल्याचे कारण देत हे काम करण्यास नकार दिला.

स्मार्ट सिटी कंपनीच्या माध्यमातून पेठरोडचे कॉंक्रिटीकरण होण्याचा मार्ग बंद झाल्याने महापालिकेच्या बांधकाम विभागाने साडेतीन कोटी रुपयांच्या निधीतून या रस्त्याची तात्पुरती डागडुजी करण्याचा मार्ग काढला. त्यानुसाठी रस्त्याची दुरुस्ती झाली. मात्र, पहिल्या पावसानंतर  रस्ता उखडला असून आता जवळपास दीड किलोमीटर भागातील डांबर वाहून जाऊन खडी उघडी पडली आहे. तसेच हॉटेल राऊ ते शरद पवार बाजार समितीपर्यंत रस्त्यावर मोठमाठे खड्डे पडले आहेत. 

Nashik

साईडपट्ट्या रुतल्या चिखलात

आरटीओ कार्यालय ते तवली फाटा या परिसरातील रस्त्याच्या साईडपट्ट्यांवर पावसाच्या पाण्यामुळे प्रचंड चिखल झाला आहे. जवळपास चार किलोमीटर परिसरातील साईडपट्ट्यांवरील चिखल झाला आहे. या रस्त्याचे मजबुतीकरण व्यवस्थित झालेले नसल्याने या साईडपट्ट्यांवरून वाहने गेल्यास तेथे मोठमोठे खड्डे पडून चिखल तयार झालेला आहे. यामुळे या दुहेरी रस्त्यावरून वाहने चालवताना मोठी कसरत करावी लागत आहे. 

बांधकाम विभागाचे म्हणणे

पूर्वी हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित होता. त्यावेळी त्याची रुंदी साडेचार मीटर होती. नंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने त्याची रुंदी साडेबारा मीटर केली. मात्र, ती करताना रस्त्याचे मजबुतीकरण चांगल्या दर्जाचे केले नाही. आधीच्या साडेचार मीटर रस्त्याच्या समान पातळीवर रस्ता उंचावत त्याचे खडीकरण व डांबरीकरण केले. मात्र, वाढीव रस्त्याचे मजबुतीकरण भक्कमपणे केले नसल्याने त्या रस्त्यावरील डांबरीकरण व खडीकरण दरवर्षी उखडून जात असते, असे महापालिकेच्या बांधकाम विभागाचे म्हणणे आहे.

Nashik

यासाठी नंतरच्या काळात तो महापालिकेकडे वर्ग करण्यात आला. या रस्त्यावरील खड्डे कायमस्वरुपी घालवायचे असेल, तर त्यासाठी स्मार्टसिटीच्या रस्त्यांच्या कामांप्रमाणे मुळापासून नवीन रस्ता तयार करावा लागेल. त्यानंतरच रस्त्यावर खड्डे पडणार नाहीत, असे महापालिका बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संदेश शिंदे यांनी 'टेंडरनामा'ला सांगितले.

मागील वर्षी या रस्त्याचे काम वर्मा नावाच्या ठेकेदाराल दिले असून, त्याचे देयक अद्याप दिलेले नाही. मात्र, जुन्या रस्त्यावर कितीही दुरुस्ती केली, तरी प्रत्येक पावसाळ्यात त्याची दुरवस्था होणारच आहे. यामुळे या रस्त्याचे कायमस्वरुपी दुखणे संपवण्यासाठी मोठ्या निधीची गरज असल्याचे बांधकाम विभागाचे म्हणणे आहे.

नाशिक महापालिका हद्दीतील पेठरोडचे कामाचे मजबुतीकरण करताना पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी ड्रेनेज व्यवस्था उभारण्याची गरज आहे. यामुळे साईडपट्ट्यावर पाणी वाहून चिखल होणार नाही व अपघात टळू शकतील. सध्या साईडपट्ट्यांवर चिखल असल्याने या अरुंद रस्त्यावरून वाहने चालवताना अपघात होत असतात. विद्यार्थ्यांना सायकल चालवता येत नाही. या रस्त्याच्या कडेने पायी चालणे पावसाळ्यात अशक्य होत असते.

- अविनाश लोखंडे, स्थानिक रहिवाशी

पेठरोडवरून गाडी चालवताना खड्ड्यांमुळे प्रचंड त्रास होत असतो. यामुळे वाहने खराब होतात, त्याचप्रमाणे वाहनांमधील प्रवाशांच्या मणक्यांनाही जोरदारपणे मार लागत असतो. परिणामी या भागातील अनेक नागरिकांना मणके विकार जडले आहेत. यामुळे या भागात या रस्त्यावरून प्रवास टाळण्याचा प्रयत्न करीत असतो. महापालिकेने या रस्त्याची कायमस्वरुपी दुरुस्ती करण्यासाठी नियोजन करण्याची गरज आहे.

- संजय पवार, नाशिक