Kumbh Mela Tendernama
उत्तर महाराष्ट्र

सिंहस्थ कुंभमेळा 2027: नाशिक-त्र्यंबकेश्वरसाठी पायाभूत सुविधा व सांस्कृतिक आराखडा अंतिम टप्प्यात

रस्ते, गर्दी व्यवस्थापन, नदी स्वच्छता, रेल्वे-विमान सेवा यांसह स्थानिक कला-संस्कृतीला जागतिक व्यासपीठ देण्याची तयारी

टेंडरनामा ब्युरो

नाशिक (Nashik): नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे २०२७ मध्ये होत असलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्यात रस्ते, गर्दी व्यवस्थापन, नदी स्वच्छता, वाहनतळ, रेल्वे, विमानसेवा आदींबाबतचे आराखडे तयार केले जात आहेत. त्यासाठी पायाभूत सुविधा उभारण्याचे आराखडे तयार करण्याचे काम सुरू असून, त्याप्रमाणे अंमलबजावणी करण्याचे काम नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाकडून सुरू आहे. त्यातच आता सिंहस्थात स्थानिक, कला, संस्कृती यांचे दर्शन घडावे यासाठी सांस्कृतिक आराखडा तयार केला जाणार आहे.

यासाठी कुंभमेळा प्राधिकरणचे आयुक्त शेखर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली स्थानिक कलाकार, सांस्कृतिक संस्था आणि कला प्रतिनिधी यांच्यासोबत बैठक झाली. यावेळी सिंहस्थात पायाभूत सुविधांबरोबरच सांस्कृतिक कार्यक्रमांचे नियोजनबद्ध आयोजन करण्याबाबत चर्चा झाली.

सिंहस्थ कुंभमेळा हा प्रामुख्याने आखाड्यांशी संबंधित साधुमहंत, प्रशासन व सिंहस्थ पर्वणी साधण्यासाठी येणारे भाविक यांच्यापुरतान मर्यादित असतो. सिंहस्थ पर्वणी काळात स्थानिकांना घराबाहेर पडता येणार नाही, असे नियोजन पोलिस प्रशासनाने केलेले असते. यामुळे सिंहस्थ पर्वणी म्हणजे नाशिक शहरातील नागरिकांच्या हालचालीवर नियंत्रण आणणे, असे आतापर्यंतच्या सिंहस्थाचे चित्र आहे.

यावेळी कुंभमेळा प्राधिकरणाने हे चित्र बदलण्याचा निर्णय घेतलेला आहे. यासाठी सिंहस्थनिमित्ताने रस्ते, वाहतूक, सुरक्षा आणि इतर मूलभूत सुविधा उभारतानाच त्याला पूरक अशा सांस्कृतिक कार्यक्रमांची आखणीही करण्यात येणार आहे.

यासाठी कुंभमेळा प्राधिकरणाचे अध्यक्ष शेखर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली नाशिकमधील कलाकारांची बैठक झाली. त्यात प्रामुख्याने कुंभमेळ्याच्या आध्यात्मिक वातावरणाशी सुसंगत असे सांस्कृतिक सादरीकरण घडवून आणण्याचा उद्देश असल्याचे प्राधिकरणाकडून स्थानिक कलाकारांना सांगण्यात आले.

बैठकीत कलाकारांनी विविध कार्यक्रम प्रकारांबाबत सूचना मांडल्या. आदिवासी कला सादरीकरणे, पारंपरिक खाद्य महोत्सव, लोकनृत्य व भक्तीपर कार्यक्रम, कुंभ परंपरेवर आधारित कथानकात्मक सादरीकरणे आदींचा समावेश असलेली सुमारे ४५ कार्यक्रमांची यादी यावेळी तयार करण्यात आली.

या विविध कलाप्रकारांचे सादरीकरण करण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी रंगमंच उभारणी, वेगवेगळ्या ठिकाणी लहान स्वरुपातील सादरीकरणे, ध्वनी व्यवस्था, कलाकारांसाठी आवश्यक सुविधा उभारण्याबाबत चर्चा झाली. हे सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यासाठी कार्यक्रम स्थळांची येत्या काही दिवसांत प्रत्यक्ष पाहणी करण्यात येणार असल्याचे बैठकीत ठरले.
 

कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह यांनी सांगितले की, सिंहस्थ हा श्रद्धेचा उत्सव असला तरी तो सांस्कृतिक अभिव्यक्तीचाही मोठा मंच आहे. कलाकारांनी मांडलेल्या सूचनांच्या आधारे शिस्तबद्ध आणि सर्वसमावेशक सांस्कृतिक आराखडा तयार करण्यात येईल. बैठकीस कुंभमेळा प्राधिकरण अधिकारी, विविध कला प्रकारांचे प्रतिनिधी, लोककला, आदिवासी कला, भक्ती संगीत आणि सांस्कृतिक संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.

बैठकीत मांडलेल्या सूचनांचा समावेश करून सांस्कृतिक कार्यक्रमांचे नियोजन टप्प्याटप्प्याने करण्यात येणार असून, ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी होणाऱ्या ध्वजारोहण सोहळ्यापासून विविध कार्यक्रमांची सुरुवात करण्याचे नियोजन असल्याची माहिती कुंभमेळा प्राधिकरणाने दिली.