Trimbakeshwar Temple Nashik
Trimbakeshwar Temple Nashik Tendernama
उत्तर महाराष्ट्र

Nashik : पर्यटन विभागाने 50 कोटींच्या कामांवरील स्थगिती उठवली

टेंडरनामा ब्युरो

नाशिक (Nashik) : पर्यटन विभागाने नाशिक जिल्ह्यातील अनेक पर्यटन स्थळांच्या विकासासाठी मंजूर केलेल्या १७५ कोटींच्या विकासकामांपैकी ५० कोटींच्या कामांवरील स्थगिती उठवण्याचा निर्णय घेतला आहे. या ५० कोटींच्या कामांना तीस टक्के निधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे.

यामुळे नाशिक जिल्ह्यातील सप्तश्रृंग गड, दिंडोरी तालुक्यातील दत्ताचे करंजी व नाशिक शहरातील अभिनव भारत मंदिर व प्रसिद्ध भिवतास धबधबा परिसर विकासासाठी निधी उपलब्ध झाला असून, या पर्यटन स्थळांची वर्षभरापासून प्रलंबित असलेली कामे आता मार्गी लागणार आहेत.

राज्याच्या पर्यटन विभागाने मागील वर्षी २९ मार्च २०२२ रोजी १०५.६० कोटी रुपयांच्या पर्यटन स्थळ विकास कामांना प्रशासकीय मान्यता देऊन निधी मंजूर केला होता. त्यानंतर राज्यात सत्तांतर होत असतानाच्या काळातही २८ जून २०२२ रोजी ७० कोटींच्या कामांना प्रशासकीय मान्यता देऊन काही प्रमाणात निधी मंजूर केला होता.

या निधीतून नाशिक जिल्ह्यात जवळपास ५२ कामे मंजूर केली होती. दरम्यान राज्यात सत्तांतर झाल्यानंतर सरकारने जुलैमध्ये एका निर्णयाद्वारे एप्रिल २०२१ नंतर मंजूर केलेली व टेंडर प्रक्रिया न राबवलेल्या सर्व कामांना स्थगिती देण्याचा निर्णय घेतला. पुढे पालकमंत्र्यांच्या नियुक्त्या झाल्यानंतर सरकारने टप्प्या टप्प्याने या कामांवरील स्थगिती उठवण्याचा निर्णय घेतला. मात्र, पर्यटन विकास विभागाने या कामांवरील स्थगिती उठवलेली नव्हती. मधल्या काळात यातील काही मोजक्या कामांवरील उठवलेली स्थगिती पुन्हा लागू केली. यामुळे ही मंजूर झालेली कामे रद्द होण्याची भीती व्यक्त होत होती.

दरम्यान मार्च अखेरीस पर्यटन विकास मंत्र्यांनी कामांवरील स्थगिती काही प्रमाणात उठवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार २१ मार्चला पर्यटन विभागाने शासन निर्णय घेऊनच २९ मार्च २०२२ व २८ जून २०२२ रोजी मंजूर केलेल्या कामांवरील स्थगिती उठवली आहे. त्यानुसार नाशिक जिल्ह्यातील १५ कामांवरील स्थगिती उठवून त्या कामांना मंजूर प्रशासकीय मान्यतेच्या तीस टक्के निधी वितरित केला आहे.

या निर्णयामुळे नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी, कळवण, सिन्नर, त्र्यंबेकश्‍वर, इगतपुरी या तालुक्यांसह नाशिक शहरातील पर्यटन विकासाची कामे मार्गी लागणार आहेत. या कामांमध्ये प्रामुख्याने नाशिक शहरातील अभिनव भारत मंदिराच्या विकासकामांचा समावेश आहे. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त पर्यटन विकास विभागाने अभिनव भारत मंदिरासाठी ५ कोटी रुपये निधी मंजूर केला होता.

त्या निधीच्या श्रेयावरून खासदार हेमंत गोडसे व आमदार देवयानी फरांचे यांच्यात श्रेयाची लढाई झाली होती. मात्र, या कामांना स्थगिती दिल्यानंतर तो विषय मागे पडला होता. आता पर्यटन विभागाने ही स्थगिती उठवल्यामुळे अभिनव भारत मंदिराचा प्रश्‍न मार्गी लागणार आहे.

पर्यटन विभागाने स्थगिती उठवून निधी मंजूर केलेल्या कामांमध्ये प्रामुख्याने सप्तश्रृंग गडावरील शिवालय तळ्याचा विकास, दिंडोरी तालुक्यातील करंजी येथील दत्त मंदिर परिसर विकास, इगतपुरी तालुक्यातील घारगड किल्ल्याचा विकास, पेठ तालुक्यातील उंबरठाण येथील हुतात्मा स्मारक व पेठ तालुक्यातील प्रसिद्ध भिवतास धबधबा परिसराच्या विकासकामांचा समावेश आहे.