नाशिक (Nashik): नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वे मार्ग कसा जाणार याबाबतच्या गोंधळावर अखेर रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी पडदा टाकला आहे. त्यांनी संसदेत याबाबत दिलेल्या उत्तरात नाशिक-पुणे रेल्वेमार्ग हा शिर्डी, अहिल्यानगर मार्गे होणार असल्याचे स्पष्ट केले आहे. हा नवीन रेल्वेमार्ग मध्यरेल्वे उभारणार असून लवकरच या मार्गासाठी भूसंपादन प्रक्रिया सुरू होणार आहे.
रेल्वेमंत्री यांनी दिलेल्या माहितीनुसार हा रेल्वेमार्ग नाशिक ते शिर्डी व पुणे ते अहिल्यानगर असा दोन टप्प्यात असणार आहे. अहिल्यानगर ते शिर्डी या अस्तित्वातील मार्गाचे दुहेरीकरण करून त्यावरून नाशिक-पुणे रेल्वे धावणार आहे.
महाराष्ट्र सरकार, केंद्र सरकार व महारेल यांनी मिळून नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वे उभारण्याचे काम सुरू केले होते. त्यासाठी नाशिक, अहिल्यानगर व पुणे या जिल्ह्यांमध्ये भूसंपादन प्रक्रियाही सुरू केली होती. दरम्यान हा मार्ग व्यवहार्य नसून महारेलने रेल्वेची परवानगी न घेताच काम सुरू केल्याचा आक्षेप रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी घेत हा रेल्वे मार्ग रद्द केला होता.
दरम्यान नारायणगाव येथील ‘जीएमआरटी’ला (जायंट मीटरवेव्ह रेडिओ दुर्बीण) या प्रस्तावित रेल्वेमार्गामुळे बाधा निर्माण होत असल्याने रेल्वे मंत्रालयाने प्रस्तावित पुणे-नाशिक हायस्पीडचा लोहमार्ग रद्द केल्याचे कारण दिले होते. रेल्वेमंत्र्यांनी हा प्रकल्प व्यवहार्य करण्याची जबाबदारी महाराष्ट्र सरकारवर सोपवली होती. त्यानुसार महाराष्ट्र सरकारने शिर्डीमार्गे हा रेल्वेमार्ग सूचवला. रेल्वे मंत्रालयाने त्यानुसार सर्व्हे करून शिर्डीवरून तो रेल्वेमार्ग अहिल्यानगर व तेथून पुणे असा मार्ग प्रस्तावित केला.
या नवीन रेल्वे मार्गामुळे नाशिक-पुणे रेल्वे अंतर वाढणार असून त्याचा काहीही उपयोग होणार नाही. यामुळे हा रेल्वेमार्ग नाशिक- संगमनेर-नारायणगाव- राजगुरू नगर- पुणे असा करण्यात यावा, यासाठी या भागातील लोकप्रतिनिधींनी मुंबईत बैठकही घेतली होती. त्या बैठकीत रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेण्याचाही निर्णय झाला होता. मात्र, त्यानंतर काहीही घडामोड झाली नाही.
अश्विनी वैष्णव यांनी संसदेत या रेल्वेमार्गाबाबत माहिती दिली. त्यांनी सांगितल्यानुसार नवीन रेल्वेमार्ग हा ‘जीएमआरटी’पासून सुमारे १२ किलोमीटर अंतरावरून जाणार आहे. पुणे ते नाशिक लोहमार्ग हा दोन टप्प्यात होत असून यात पुणे ते अहिल्यानगर हा सुमारे १३३ किलोमीटरचा लांबीच्या मार्गासाठी सुमारे ८ हजार ९७० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. याचा प्रस्ताव सध्या रेल्वे बोर्डाकडे मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. हा मार्ग सध्याच्या नगर-नाशिक या महामार्गाला समांतर असणार आहे. हा रेल्वेमार्ग चाकणमार्गे असणार आहे.
दुसरा टप्पा हा शिर्डी नाशिक असणार आहे. या मार्गाच्या कामाला लवकरच सुरुवात होईल, असे त्यांनी सांगितले. महारेलने पुणे-नाशिकसाठी दुसऱ्या मार्गासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल काही महिन्यापूर्वीच रेल्वे बोर्डाला सादर केला आहे. त्यानुसार हा मार्ग पुणे-चाकण-अहिल्यानगर-निंबळक-पुणतांबा-शिर्डी-नाशिक असा असणार आहे.
शिर्डी ते नाशिक यासाठी नवीन मार्ग निश्चित केला आहे. अहिल्यानगरहून नाशिकसाठी नवीन मार्ग असणार आहे. या रेल्वेमार्गावर अहिल्यानगर-निंबळक-पुणतांबा-शिर्डी-सिन्नर-नाशिक ही स्थानके असणार आहेत.
नवीन रेल्वेमार्गाविषयी...
नवीन रेल्वे मार्ग ‘ब्रॉडगेज’ असेल त्यावरून ताशी १६० ते १८० किमी वेगाने रेल्वेगाडी धावू शकेल
नव्या रेल्वेमार्गामुळे पुणे-नाशिक दरम्यान काही प्रमाणात अंतर व वेळ वाढेल
पुणे ते अहिल्यानगर १३३ किलोमाटरसाठी ८ हजार ९७० कोटी रुपयांचा खर्च
अहिल्यानगर ते निंबळक या ६ किलोमीटरचे दुहेरीकरणाचे काम प्रगतिपथावर
निंबळक ते पुणतांबा हे ८० किलोमीटरचे दुहेरीकरण पूर्ण
पुणतांबा - शिर्डी या १७ किलोमाटरच्या मार्गासाठी २४० कोटी रुपये मंजूर
शिर्डी - नाशिक : डीपीआर मंजुरीच्या प्रतीक्षेत