नाशिक (Nashik): सिंहस्थ कुंभमेळा काळात तीन-चार महिन्यांसाठी साधुग्राम उभारल्यानंतर त्या आरक्षित जमिनीचे अतिक्रमणापासून संरक्षण करण्याचे मोठे आव्हान महापालिका प्रशासनासमोर असते. तसेच केवळ तीन-चार महिन्यांसाठी उपयोगात येणाऱ्या या जमिनाचा इतर काळातही उपयोग झाला पाहिजे, या हेतुने महापालिका प्रशासनाने या भागातील ३५ एकर क्षेत्रावर प्रदर्शनी केंद्र (माईस हब) उभारण्याचा निर्णय घेतला आहे.
यासाठी महापालिकेने सार्वजनिक-खासगी भागिदारी तत्वावर प्रदर्शनी केंद्र उभारण्यासाठी इच्छुकांकडून प्रस्ताव मागवणारे २२० कोटींचे टेंडर प्रसिद्ध केले आहे. या प्रकल्पांतर्गत विकासकाला महापालिका ३३ वर्षांसाठी ३५ एकर जागा उपलब्ध करून देणार असून महापालिकेला या जागा वापरातून नियमित उत्पन्न मिळू शकणार आहे.
नाशिक येथे दर बारा वर्षांनी सिंहस्थ कुंभमेळा भरतो. या सिंहस्थानिमित्ताने वैष्णव संप्रदायाचे तीन आखाडे नाशिक येथे शाही स्नान करण्यासाठी येतात. यासाठी साधुंच्या निवासाची सोय तपोवनात साधुग्राम उभारून केली जाते.
यात महापालिकेच्या ताब्यात ९० एकर क्षेत्र असून उर्वरित जागा शेतकऱ्यांकडून वर्षभरासाठी भाडेतत्वावर घेतली जाते. मात्र, साधुग्राम उभारण्यातून त्या शेतजमिनीचे मोठे नुकसान होत असल्याने व जमिनींवर साधुग्रामचे आरक्षण असल्यामुळे त्या जमिनीचा व्यावसायिक कारणासाठी उपयोग करता येत नाही. यामुळे या जमिनींचे अधिग्रहण करून घ्या, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.
यामुळे आगामी सिंहस्थासाठी शेतकऱ्यांच्या जमिनींचे अधिग्रहण करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. एवढी मोठी जमीन महापालिकेकडे येणार असून त्यासाठी राज्य सरकार व महापालिका यांना अब्जावधी रुपये खर्च करावा लागणार आहे. यामुळे सिंहस्थ वगळता इतर काळात या जागेचा वापर व्हावा व सिंहस्थ काळात त्या जागेचा साधुग्रामसाठीही उपयोग व्हावा, या हेतुने महापालिका प्रशासन व सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरण यांनी यातील ३५ एकर जागेवर प्रदर्शनी केंद्र उभारण्याचा निर्णय घेतला आहे.
प्रदर्शनी केंद्र उभारण्यासाठी महापालिकेने विकासकांकडून देकार मागवण्यासाठी टेंडर प्रसिद्ध केले आहे. तेथे ‘जर्मन हँगर’सारखे तंबू उभारले जातील. तसेच या प्रदर्शनी केंद्रात अद्ययावत बैठक व्यवस्था, प्रोत्साहन, परिषद आणि प्रदर्शन केंद्र असणार आहे, अशी ती संकल्पना आहे.
या जागेवर प्रदर्शनी केंद्र उभारणाऱ्या विकासकाला सिंहस्थ कुंभमेळा काळात वर्षभरासाठी ही जागा महापालिकेला द्यावी लागेल. उर्वरित काळात प्रदर्शनी केंद्रातून महापालिकेला उत्पन्न मिळेल, असे नियोजन आहे. सिंहस्थकाळात साधू-महंतांसाठी जागेचा उपयोग आणि उर्वरित काळात पडून राहणाऱ्या जागेतून अर्थार्जन होईल व त्या जागेवरील अतिक्रमणाचा धोकाही टळणार आहे.
‘जर्मन हँगर’सारखे तंबू उभारले जाणार असल्याने सिंहस्थ काळात कोणताही बदल न करता या तंबूंमध्ये साधुंना निवासाची सोय करता येणार आहे. यामुळे दर बारा वर्षांनी तंबू उभारण्याचा खर्चही वाचणार आहे.
नाशिकच्या पर्यटनात वाढ
तपोवनात ३५ एकर जागेवर प्रदर्शनी केंद्र उभारल्यामुळे नाशिकमध्ये कृषी, औद्योगिक प्रदर्शनांशिवाय, वेगवेगळ्या परिषदा, सभा-संमेलने, धार्मिक कार्यक्रम यांच्यासाठी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध होऊ शकणार आहे. यामुळे नाशिकमध्ये असे कार्यक्रम घेण्यासाठी राज्यभरातून पसंती मिळून नाशिकच्या पर्यटनात वाढ होऊ शकणार आहे.