Water cannel
Water cannel Tendernama
उत्तर महाराष्ट्र

Nashik : बंदिस्त पूल कालव्यांचा सिन्नर पॅटर्न; 20 km पाईपलाईनसाठी 13 कोटी मंजूर

टेंडरनामा ब्युरो

नाशिक (Nashik) : सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी देव नदीतून कुंदेवाडी ते सायाळे व खोपडी ते मीरगाव या बंदिस्त कालव्यांच्या योजनांनंतर देवनदीवरील सहा ब्रिटिशकालीन कालव्यांचे बंद नलिकेत रूपांतर केले जाणार आहे. यासाठी आमदार ॲड. माणिकराव कोकाटे यांच्या प्रयत्नातून जलसंधारण महामंडळाने १३.५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.

बंदिस्त कालव्यांमुळे वहन क्षमता वाढून परिसरातील सुमारे ९४० हेक्टरला त्याचा लाभ होणार आहे. यामुळे आधीच्या ६० किलोमीटरच्या बंदिस्त कालव्यांनंतर आता आणखी २० किलोमीटर बंदिस्त कालवे होऊन सिन्नर तालुक्यातील सिंचनक्षेत्र वाढण्यास मदत होणार आहे.

सिन्नर कायमस्वरुपी दुष्काळी तालुका असून पूर्व भागातील पर्जन्य सरासरी ३०० मिलीमीटरपेक्षाही कमी आहे. त्याचवेळी सिन्नर तालुक्याच्या पश्चिम भागातून देवनदीचा उगम होऊन ते सिन्नर तालुक्यातून वाहते. मात्र, गोदावरी - मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने गोदावरी खोऱ्यात नवीन बंधारे बांधण्यास बंदी घातलेली असल्याने देवनदीवर बंधारे बांधता येत नाहीत, तसेच सिन्नर तालुक्यातही नवीन बंधारे बांधण्याची कामे ठप्प आहेत.

एकीकडे देवनदीतून वर्षाला जवळपास तीन टीएमसी पाणी गोदावरीत वाहून जाते, पण त्याचा सिन्नर तालुक्याला उपयोग होत नाही, अशी परिस्थिती असल्यामुळे सुरवातीला देवनदीवर बंधारे बांधून पाणी अडवण्यात आले. त्यानंतरही पाणी वाहून जात असल्यामुळे देवनदीचे पूरपाणी पूर्वभागात नेण्याची योजना आखण्यात आली.

त्यासाठी पूरचाऱ्या तयार करण्याचा प्रस्ताव तयार करून त्याला पाणी उपलब्धता दाखलाही मिळवण्यात आला. मात्र, कालवे उभारण्यासाठी होणारे भूसंपादन व पाणी वहनातून होणारे नुकसान यावर बंदिस्त कालव्यांचा पर्याय शोधण्यात आला. त्यानुसार देवनदीतून कुंदेवाडी ते सायाळे हा ३५ किलोमीटर व खोपडी ते मीरगाव हा २५ किलोमीटर असे दोन कालवे उभारण्यात येत आहेत.

या कालव्यांद्वारे देवनदीचे जवळपास २०० दलघफू पूरपाणी दुष्काळी भागात नेऊन तेथील बंधारे भरून दिले जाणार आहेत. यातील कुंदेवाडी सायाळे या योजनेची चाचणीही झाली आहे. बंदिस्त कालव्यांमुळे सिन्नर तालुक्यातील सर्व नद्या एकमेकांना जोडल्या गेल्या आहेत. त्याच धर्तीवर देवनदीच्या वरच्या भागातील सिंचन वाढावे म्हणून बंदिस्त कालव्यांचा प्रस्ताव तयार करण्यात आला.

देवनदीचा उगम ते सिन्नर या भागात देवनदीवर ब्रिटीशकालीन कालवे आहेत. या कालव्यांद्वारे देवनदीलगतच्या भागाचे सिंचन केले जाते. मात्र, मधल्या काळात या कालव्यांचे खोलीकरण केल्याने सिंचनासाठी पाणी घेणे अवघड झाले होते. त्यावर तोडगा म्हणून आमदार माणिकराव कोकाटे यांनी बंदिस्त कालव्यांचा मार्ग शोधला.

यामुळे केवळ देवनदीलगतच्याच नाही, तर वडगाव सिन्नर, सोनारी, आटकवडे, भाटवाडी, मनेगाव, पाटोळे, रामनगर, धोंडवीरनगर, लोणारवाडी आदी गावांना आता बंदिस्त कालव्यांद्वारे पाणी नेता येणार आहे. यासाठी १३.५ कोटींच्या निधीतून जवळपास २० किलोमीटरचे बंदिस्त कालवे उभारले जाणार आहेत.

असे होणार बंदिस्त कालवे
वडगाव-धोंडवीरनगर कालव्याची लांबी सहा किलोमीटर असून ९०० मिलिमीटर व्यासाच्या पाईपलाईनद्वारे पाणी वडगाव, आटकवडे, सोनारी, लोणारवाडी, भाटवाडी, सिन्नर, मनेगाव, पाटोळे, रामनगर, धोंडवीरनगर आदी भागांत पोचणार आहे. सुमारे २०० हेक्टरला लाभ होणार आहे. देवनदी ते लोणारवाडी कालव्याची लांबी दोन किलोमीटर असून त्याच्या ९०० मिलिमीटर व्यासाच्या पाईपलाईनची वहन क्षमता १३ क्यूसेक आहे. यातून लोणारवाडी व भाटवाडी येथील १०० हेक्टरला फायदा होणार आहे.

सुमारे ३.५ किलोमीटरच्या कुंदेवादी-मुसळगाव कालव्यासाठीही ९०० मिलिमीटर व्यासाची पाईपलाईन टाकण्यात येणार असून, तिची वहनक्षमता १५ क्यूसेक आहे. कुंदेवाडी व मुसळगावच्या १५० हेक्टरला लाभ होईल. मुसळगाव- दातली कालव्याच्या ९०० मिलिमीटर पाईपलाईनमधून १५ क्यूसेस क्षमतेने पाणी वाहणार असून मुसळगाव, दातली व खोपडी येथील ३०० हेक्टर ओलिताखाली येणार आहे.

गगन बंधारा ते बोडके वस्ती सोनांबे १.५ किलोमीटर कालव्याच्या पाईपलाईनचा व्यास ६०० मिलिमीटर असून, त्यातून १२ क्यूसेक क्षमतेने पाणी वाहणार आहे. त्याचा फायदा कोनांवे व सोनांबे येथील ९० हेक्टरला होईल. म्हाळुंगी नदी ते टेंभुरवाडी १.५ किलोमीटर कालव्याची वहन क्षमता १२ क्यूसेक असून, त्यासाठी ६०० मिलिमीटर व्यासाची पाईपलाईन टाकली जाणार आहे. त्यातून टेंभुरवाडी येथील १०० हेक्टरला फायदा होईल.

ब्रिटिशकालीन सहा कालव्यांची फक्त डागडुजी करून उपयोग होणार नाही, ही बाब उक्षात आली. पाईपलाईनद्वारे कालवे बंदिस्त करून त्यांना संजीवनी देणे गरजेचे होते. त्यासाठी शासनाकडून मंजुरी मिळविण्यात यश आहे. आणखी १५ ते २० योजनांचे सर्व्हेक्षण झाले त्याही लवकरच मंजूर होतील.
- अॅड. माणिकराव कोकाटे, आमदार

सरकारच्या धोरणानुसार अद्याप बंदिस्त कालव्यांसाठी स्वतंत्र लेखाशीर्ष नसल्यामुळे बंदिस्त कालव्यांच्या योजना राबवण्यात मोठ्या अडचणी येत आहेत. सरकारने यासाठी स्वतंत्र लेखाशीर्ष तयार करून निधीची तरतूद केल्यास दुष्काळी भागासाठी हे बंदिस्त कालवे वरदान ठरणार आहेत. भविष्यातील देवनदी जोड प्रकल्पांसाठीही हे बंदिस्त कालवे फायद्याचे ठरणार असून त्यामुळे सिन्नरच्या पूर्वभागातील सिंचनक्षेत्र वाढण्यास मदत होणार आहे.
- अविनाश लोखंडे, निवृत्त शाखा अभियंता, लघुपाटबंधारे विभाग, नाशिक