Trimbakeshwar, Nashik, Kumbh Mela Infra Tendernama
उत्तर महाराष्ट्र

Nashik Kumbh 2027: 'त्या' 18 ठेकेदारांना दणका; रस्त्यांची केवळ 15 टक्केच कामे पूर्ण

नाशिक महापालिकेच्या बांधकाम विभागाची कारवाई

टेंडरनामा ब्युरो

नाशिक (Nashik): सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्ताने नाशिक महापालिका हद्दीत १८ रस्त्यांच्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे. महापालिकेने या कामांनी दिलेल्या कार्यारंभ आदेशानुसार एप्रिल अखेरपर्यंत २५ टक्के कामे पूर्ण होणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात केवळ १५ टक्के कामे झाली आहेत. यामुळे कामांचा अपेक्षित वेग न राखू शकलेल्या १८ कंत्राटदारांना नाशिक महापालिकेच्या बांधकाम विभागाने कामाच्या संथ गतीबद्दल आणि वेळापत्रकातील टप्पे न पाळल्याबद्दल नोटिसा बजावल्या आहेत.

शहरातील रस्त्यांची कामे सुरू करण्यापूर्वी रस्त्याच्या कडेला भूमिगत बहुउपयोगी (युटीलिटी) डक्ट उभारण्यात येत असून त्या कामांना उशीर होत असल्याने रस्ते कामांचा वेग संथ असल्याचे बोलले जात आहे. मात्र, कामांचा हा वेग असाच राहिल्यास ३१ मार्च २०२७ पर्यंत कामे पूर्ण होण्याबाबत साशंकता व्यक्त होत आहे.

नाशिक महापालिका हद्दीत जवळपास १२७० कोटींच्या निधीतून २७ रस्ते कामांना मंजुरी देण्यात आली आहे. हा कामे ३१ मार्च २०२७ पर्यंत पूर्ण करण्याचे आदेश आहेत. या प्रकल्पांतर्गत भूमिगत युटिलिटीचे स्थलांतर, रस्ते रुंदीकरण, काँक्रीट व डांबरीकरण, मध्यभागी दुभाजक (मिडियन) आणि पदपथांची उभारणी, तसेच अंतर्गत व बाह्य रस्ते जोडणी सुधारण्याची कामे करण्यात येत आहेत.

या रस्त्यांची कामे सुरू करण्यापूर्वी दीर्घकालीन नियोजनाचा भाग म्हणून महापालिका महत्त्वाच्या मार्गांवर एकात्मिक युटिलिटी डक्ट प्रणाली उभारण्यावर भर देत आहे. युटीलिटी डक्टची कामे पूर्ण झाल्यानंतर पाणीपुरवठा, मलनिस्सारण, वीजवाहिन्या आणि दूरसंचार यांसारख्या सर्व सेवा एकाच भूमिगत डक्टमधून नेल्या जातील. त्यामुळे भविष्यात दुरुस्ती किंवा नवीन जोडण्यांसाठी वारंवार रस्ते खोदण्याची गरज भासणार नाही. यामुळे युटीलिटी डक्टची कामेही महत्त्वाची आहेत.

यामुळे भूमिगत डक्टची कामे पूर्ण झाल्याशिवाय त्या भागातील रस्त्यांची कामे सुरू करता येत नाहीत. मात्र, या भूमिगत युटिलिटी डक्टच्या कामांना विलंब होत असल्याने त्याचा परिणाम रस्त्यांच्या कामांवर होत आहे.

युटिलिटी डक्टचे काम १५ फेब्रुवारीपर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, अनेक वेळा मुदतवाढ देऊनही बहुतेक प्रकल्प अपूर्णच आहेत, आणि आता ३० एप्रिलची अंतिम सुधारित मुदत संपत आली आहे, तरीही ती कामे पूर्ण झालेली नाहीत. यामुळे या युटीलिटी डक्टच्या कामांना नव्याने मुदतवाढ द्यावी लागणार आहे.

ज्या भागातील युटीलिटी डक्टची कामे पूर्ण झाली आहेत, त्या भागातील रस्त्यांची कामे ठेकेदारांनी सुरू केली असली तरी त्या कामांची गती कार्यारंभ आदेशात नमूद केल्याप्रमाणे नाही. यामुळे सर्व संबंधित कंत्राटदारांना स्मरणपत्रे आणि नोटिसा देण्यात आल्या आहेत. कार्यारंभ आदेश दिल्याच्या तारखेपासूनच्या नियोजित वेळापत्रकानुसार ३० एप्रिल २०२६ पर्यंत या २८ रस्त्यांचे सरासरी २५ टक्के काम पूर्ण होणे अपेक्षित होते.

प्रत्यक्षात सरासरी केवळ १५ टक्के काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे सर्व कंत्राटदारांना कामाचा वेग वाढवण्याचे आणि वेळापत्रकाचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश महापालिकेच्या बांधकाम विभागाने दिले आहेत.सध्या शहरातील प्रमुख आणि वाहतूकदृष्ट्या महत्त्वाच्या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर काम सुरू आहे. यापैकी सुमारे निम्म्या रस्त्यांवर ‘व्हाइट-टॉपिंग’ तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. या २८ रस्त्यांच्या विकासासाठी १२७० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.