नाशिक (Nashik) : नाशिक शहरातील निओ मेट्रो (Neo Metro) या टायरबेस मेट्रो प्रकल्पाला केंद्र सरकारची मंजुरी मिळाली नसली, तरी भविष्यात हा प्रकल्प होणार आहे, हे गृहित धरून शहरातील द्वारका चौक ते नाशिकरोड य दरम्यान सात किलोमीटरच्या डबल डेकर पुलाचा आराखडा तयार करण्याच्या सूचना सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक प्रकल्प) दादा भुसे (Dada Bhuse) यांनी मुंबईत झालेल्या बैठकीत दिले आहेत.
केंद्र सरकारच्या सागरमाला प्रकल्पातून हा सात किलोमीटर लांबीचा डबलडेकर प्रकल्प मंजूर झाला असला, तरी निओ मेट्रो प्रकल्पाच्या मंजुरीअभावी तो रखडला आहे. यामुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, नाशिक महापालिका व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांसोबतच्या बैठकीत पालकमंत्री दादा भुसे यांनी पुलाचे काम मार्गी लावण्याच्या सूचना दिल्या आहेत.
नाशिक शहराचा विस्तार झपाट्याने वाढत आहे. शहरामध्ये सद्यःस्थितीत दिवसभरात अडीच ते पावणेतीन लाख वाहने रस्त्यांवर धावतात. त्यात नाशिक शहरातून मुंबई-आग्रा व नाशिक-पुणे हे दोन राष्ट्रीय महामार्ग जातात. त्यामुळे अवजड वाहतूकदेखील मोठ्या प्रमाणात होते.
गरवारे पॉइंटपासून ते आडगावपर्यंत उड्डाणपूल तयार झाल्याने काही प्रमाणात वाहतुकीवरचा ताण कमी झाला. मात्र नाशिकहून पुण्याकडे जाताना नाशिक रोडपर्यंत अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागतो. मोठ्या प्रमाणात वाहतूक ठप्प होते.
यावर तोडगा म्हणून केंद्र सरकारच्या सागरमाला योजनेतून द्वारका ते नाशिकरोड हा सात किलोमीटरचा उड्डाणपूल मंजूर करण्यात आला. याच भागातून महापालिकेने प्रस्तावित केलेला निओ मेट्रो हा टायर बेस्ट मेट्रो प्रकल्प जाणार असल्याने केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दत्त मंदीर ते द्वारका हा उड्डाण पूल डबल डेकर करण्यास मंजुरी दिली व उड्डाणपुलासाठी तरतूद देखील केली. मात्र निओ मेट्रो प्रकल्पास केंद्र सरकारकडून अद्याप मान्यता मिळाली नसल्यामुळे त्याचे भवितव्य अंधारात आहे.
यामुळे द्वारका ते नाशिकरोड उड्डाणपुलाचेही काय होणार असा प्रश्न असतानाच मुंबईत सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम) पालकमंत्री दादा भुसे यांच्या दालनात बैठक झाली. त्यात मेट्रो प्रकल्पाला अद्यापही मंजुरी नसल्याचे मेट्रोच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आल्याने डबलडेकर पूल तयार करायचा तरी कसा व कशासाठी असा प्रश्न निर्माण झाला.
दरम्यान भविष्यात प्रकल्पाला मंजुरी मिळणार असल्याचे गृहित धरून या डबलडेकर पुलाचा आराखडा तयार करण्याच्या सूचना मंत्री भुसे यांनी दिल्या. बैठकीला राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे भाऊसाहेब साळुंखे, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी, शहर अभियंता शिवकुमार वंजारी, कार्यकारी अभियंता संदेश शिंदे आदी उपस्थित होते.