NMC, Nashik Tendernama
उत्तर महाराष्ट्र

Nashik: एनकॅप योजनेतील चुकीची कामे रडारवर; केंद्राकडून ऑडिट होणार

टेंडरनामा ब्युरो

नाशिक (Nashik): केंद्र शासनाच्या राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रम (एन-कॅप) अंतर्गत नाशिक महापालिकेला ८७ कोटी रुपये निधी प्राप्त झालेला आहे. या योजनेची मुदत संपूनही महापालिकेने मंजूर केलेल्या कामांपैकी तीन कामे अपूर्ण आहेत. त्यातच केंद्राच्या पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयातर्फे ऑडिट केले जाणार आहे. या योजनेतून कामे प्रस्तावित करताना काहीवेळा स्वच्छ हवेशीसंबंध नसलेली कामे केली आहेत. यामुळे कागदपत्रांची जमवाजमव करताना महापालिकेच्या पर्यावरण विभागाची चांगलीच दमछाक होत आहे.

हवेतील गुणवत्ता सुधारण्यासाठी केंद्र शासनाच्या माध्यमातून राष्ट्रीय स्वच्छ हवा कृती कार्यक्रमाची (एन-कॅप) देशभरात अंमलबजावणी केली जात आहे. या कार्यक्रमाअंतर्गत नाशिक महापालिकेला केंद्राकडून ८७ कोटींचा निधी प्राप्त झाला होता. या निधीतून पर्यावरण संवर्धनासाठी कामे हाती घेणे अपेक्षित होते. मात्र, महापालिका अधिकाऱ्यांची कल्पकता कमी पडल्याने सुरुवातीला कोणती कामे घ्यावीत, यातच वेळ गेला.

त्यानंतर निधी खर्चाबाबत विचारणा झाल्याने सौर दिवे, रस्त्याच्या कडेला हिरवळ या प्रकारची कामे हाती घेतली. एवढेच नाही तर या निधीतून घंटागाडी तळावर सीसीटीव्ही लावण्यासारखीही कामे या निधीतून केली आहेत.

राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमातून यांत्रिकी झाडू खरेदी, मनपाच्या विविध मिळकतींवर सौरऊर्जा प्रकल्प बसविणे, सायकल ट्रॅक, रस्ते दुभाजकांमध्ये वृक्षलागवड, विद्युत दाहिनी आदी चांगल्या प्रकल्पांचा समावेश आहे. एन-कॅपअंतर्गत हाती  घेण्यात आलेल्या कामांवर महापालिकेच्या माध्यमातून ८८ टक्के खर्च करण्यात आला आहे.

आता या कामांचे केंद्राच्या पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयातर्फे ऑडिट केले जाणार आहे. त्यासाठी एन-कॅप कृती कार्यक्रमांतर्गत झालेल्या कामांचा तपशील, नस्ती, प्रलंबित देयके तसेच स्थळपाहणीचा अहवाल सादर करावा लागणार आहे. याकरिता महापालिकेतील पर्यावरण विभागाच्या उपायुक्तांनी शहर अभियंता, विद्युत व यांत्रिकी विभागाचे अधीक्षक अभियंता, उद्यान अधीक्षकांना पत्र पाठवत माहिती तत्काळ सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

प्रलंबित निधी मिळणार

एन कॅपअंतर्गत निधी देताना केंद्राने दोन वर्षांपासून लोकप्रतिनिधीच्या महासभेचा ठराव बंधनकारक केला आहे. महापालिकेत प्रशासक राजवट असल्याने गेल्या दोन वर्षांचा निधी महापालिकेला मिळू शकलेला नाही. आता महापालिका निवडणूक झाल्याने निधी मागणीचा तसा ठराव करता येणे शक्य होणार आहे. यामुळे दोन वर्षांचा प्रलंबित निधी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

चुकीच्या कामांचे काय होणार

महापालिकेने रस्त्याच्या कडेला हिरवळ करणे, रस्ते दुभाजकात झाडे लावणे यासारखी कामे या निधीतून केली आहेत. आता सिंहस्थ कुंभमेळा निमित्ताने या रस्त्यांचे रुंदीकरण व अद्ययावतीकरण केले जात आहे. त्यात ही हिरवळ काढली जाणार आहे. तसेच दुभाजकही बदलणार असल्याने त्यातील झाडे संकटात आली आहेत. तशीच परिस्थिती सायकल ट्रॅकची होणार आहे.

यामुळे या कामांबाबत ऑडिटमध्ये काय शेरा मिळणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्याचप्रमाणे घंटागाडी वाहनतळावर सीसीटीव्ही लावल्याने हवेचे शुद्धीकरण कसे होते, याचेही उत्तर महापालिका प्रशासनाला द्यावे लागणार आहे.

एन-कॅपअंतर्गत पूर्ण झालेली कामे...

  • आडगाव ट्रक टर्मिनस येथे ई-बस डेपो

  • टाकाऊ बांधकाम साहित्य विल्हेवाट प्रकल्प

  • यांत्रिकी झाडू

  • सुलभ शौचालयांसाठी सौरऊर्जा प्रकल्प

  • घंटागाडी वाहनतळावर सीसीटीव्ही प्रकल्प

  • जलतरण तलाव येथे सौरऊर्जा प्रकल्प

  • सार्वजनिक शौचालये, उद्याने

  • नाशिकरोड, दसक अमरधाम येथे विद्युत शवदाहिनी 

  • सिडको, उंटवाडी अमरधाम येथे विद्युत शवदाहिनी

  • त्र्यंबकरोड येथे सायकल ट्रॅक

एन-कॅपअंतर्गत अपूर्ण कामे

  • ईव्ही चार्जिंग स्टेशन

  • अत्याधुनिक शवदाहिनी

  • आडगाव येथे रस्ता बांधणी