Prayagraj
Prayagraj Tendernama
उत्तर महाराष्ट्र

Nashik : नाशिक महापालिकेचे अधिकारी प्रयागराजमध्ये 'असा' करणार Homework

टेंडरनामा ब्युरो

नाशिक (Nashik) : नाशिक - त्र्यंबकेश्वर येथे २०२७-२८ मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजनासाठी प्रयागराज येथे २०२५ मध्ये होत असलेल्या कुंभमेळ्याच्या तयारीचा अभ्यास करण्याचा निर्णय नाशिक महापालिकेच्या सिंहस्थ समितीने घेतला आहे.

यासाठी नाशिक महापालिकेच्या अधिकाऱ्यांचे एक पथक लवकरच वाराणशी येथे अभ्यासासाठी जाणार आहे. वाराणसीच्या नियोजनानुसारच नाशिकमध्ये कामांचे नियोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या महामपालिकेच्या विविध विभागांनी आठ हजार कोटींचा प्रारुप आराखडा तयार केला असला, ती तो अंतिम करण्याआधी प्रयागराज येथील प्रकल्पांचा अभ्यास होणार आहे.

नाशिक येथील सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने पायाभूत सेवा सुविधा पुरवण्यासाठी महापालिकेत आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांच्या अध्यक्षतेखाली सिंहस्थ कमिटीची बैठक पार पडली. सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी पायाभूत सुविधा निर्माण कराव्या लागणार आहेत. त्यासाठी केंद्र व राज्य शासनाकडून निधी प्राप्त होतो. तसेच काही वाटा महापालिका उचलते. या निधी मागणीसाठी महापालिकेला सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार सिंहस्थ आराखडा समन्वय समिती स्थापन करण्यात आली आहे.

या समितीने विभाग प्रमुखांकडून सिंहस्थासाठी लागणारा निधी व प्रकल्पांचे प्रारुप आराखडे सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार ४३ विभागांकडून प्रारूप आराखडा सादर करण्यात आले आहेत. मात्र, यातील जवळपास सर्वच विभागांच्या आराखड्यात त्रुटी आढळल्या.

बांधकाम विभागाने आराखडा सादर करताना अवास्तव प्रस्तावांचा समावेश केला आहे. हा आराखडा जवळपास आठ हजार कोटींच्या वर गेल्याने एवढ्या मोठ्या प्रमाणात केंद्र व राज्य शासनाकडून निधी मिळेल की नाही, याबाबत साशंकता असल्याने अत्यावश्यक कामांचाच आराखड्यात समावेश करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

तसेच उत्तर प्रदेशात प्रयाग येथे २०२५ मध्ये सिंहस्थ कुंभमेळा होणार आहे. तेथे सध्या सिंहस्थपूर्व कामे सुरू आहेत. त्या कामांच्या पाहणीसाठी महापालिकेतील अभियंत्यांचे पथक अभ्यास करण्यासाठी पाठविले जाणार आहे.

प्रयागराजच्या धर्तीवर नाशिकमधील गोदाघाटाचा विकास केला जाणार आहे. घाट विकास, गोदावरी प्रदूषणमुक्ती, मलनिस्सारण केंद्राचे सक्षमीकरण या कामांना अधिक महत्व दिले जाणार असल्याचे यावेळी स्पष्ट झाले.