Nashik Municipal Corporation
Nashik Municipal Corporation Tendernama
उत्तर महाराष्ट्र

Nashik : एनकॅपच्या अडीच कोटींच्या निधीतून महापालिका खरेदी करणार ट्री प्लांटेशन यंत्र

टेंडरनामा ब्युरो

नाशिक (Nashik) : राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमातून (एनकॅप) नाशिक महापालिकेला प्राप्त झालेला निधी खर्च झालेला नाही. निधी वेळेत खर्च न झाल्यास तो परत जाऊ शकतो. यामुळे महापालिकेने या निधीतून वेगवेगळी कामे हाती घेण्यास सुरवात केली आहे. यासाठी पर्यावरण संवर्धन अथवा प्रदूषण निर्मूलन यासारखे शब्द जोडून महापालिका योजना तयार करीत असल्याचे दिसत आहे.

आता उद्यान विभाग एनकॅप अंतर्गत अडीच कोटींच्या निधीतून ट्री प्लांटेशन (वृक्षारोपण) यंत्र खरेदी करणार आहे. शहरातील रस्ते रुंदीकरण अथवा इतर कारणांमुळे वृक्ष तोडावा लागल्यास त्याचे पुनर्रोपण करण्यासाठी या यंत्राचा उपयोग केला जाणार आहे.

नाशिकमध्ये अनेक मोकळ्या भूखंडांवर टोलेजंग इमारती  उभ्या राहत आहेत. रस्ते व इतर पायाभूत सुविधांचे जाळे निर्मिती सुरू आहे. ही विकासकामे करताना पहिला प्रहार वृक्षांवर केला जातो. त्यासाठी उद्यान विभागाकडून वृक्षतोडीची परवानगी घेतली जाते. त्या बदल्यात विकासकांना वृक्ष लावणे बंधनकारक असते.

मात्र, वृक्ष मोठा होण्यासाठी दहा ते पंधरा वर्षांचा कालावधी लागतो. यामुळे उद्यान विभागाने वृक्ष न तोडता त्या  वृक्षाचे थेट दुसऱ्या जागी पुनर्रोपण करता यावे, यासाठी ट्रीप्लांटेशन (वृक्षारोपण) यंत्र खरेदीचे नियोजन सुरू केले आहे.

आगामी सिंहस्थ कुंभमेळापूर्वी शहरात अनेक रस्त्यांचे रुंदीकरण, नवीन रिंगरोड, जुन्या रिंगरोडचे  रुंदीकरण आदी कामे हाती घेतली जाणार आहेत. यात वृक्षतोड अपरिहार्य असते. ही वृक्षतोड टाळण्यासाठी उद्यान विभागाने ट्री प्लांटेशन यंत्र खरेदी करण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रम अर्थात एन-कॅपमधील निधी वापला जाणार आहे.

एन- कॅप या योजनेअंतर्गत उद्यान विभागाला शहरात हिरवाई निर्माण करण्यासाठी सहा कोटी निधी प्राप्त झाला आहे. त्यापैकी अडीच कोटी रुपयांची तरतूद या यंत्र खरेदीसाठी केली जाणार आहे. त्यादृष्टीने प्रस्ताव तयार करण्याचे काम सुरू आहे.