Nashik
Nashik Tendernama
उत्तर महाराष्ट्र

सिग्नल देखभालीसाठी नाशिक मनपा काढणार 30 लाखांचे टेंडर

टेंडरनामा ब्युरो

नाशिक (Nashik) : नाशिक शहरातील (Nashik City) 43 सिग्नलच्या देखभाल दुरुस्तीसाठी नाशिक महापालिकेने (Nashik Municipal Corporation) 30 लाख रुपयांची तरतूद केली आहे. यामुळे लवकरच महापालिका या देखभाल दुरुस्तीचे टेंडर (Tender) काढणार आहे.

नाशिक शहरातील औरंगाबाद रोडवरील हॉटेल मिरचीजवळ झालेल्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या सूचनेनुसार महापालिका अपघातग्रस्त ब्लॅकस्पॉट दुरुस्त करण्यासाठी सतर्क झाली आहे. ब्लॅकस्पॉटच्या मुद्द्यात सिग्नल नादुरुस्त असणे हा मुद्दा समोर आला आहे. यामुळे नाशिक शहरातील 43 सिग्नलची देखभाल व दुरुस्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

शहरात गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात पावसाळ्यात रस्त्यांची अवस्था दयनीय झाली असली तरी अनेक भागांमध्ये मोठ्या रस्त्यांवर सिग्नल यंत्रणा नाही. या भागात सिग्नल आहे, तेथील सिग्नल नादुरुस्त आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात अपघाताला निमंत्रण मिळते आहे. शहरात एकूण 47 सिग्नल असून, त्यात आता नव्याने सात सिग्नलची भर पडणार आहे. सध्या अस्तित्वात असलेल्या सिग्नलपैकी चार सिग्नलवर स्मार्टसिटी कंपनीमार्फत व्यवस्थापन केले जाते. महापालिकेमार्फत 43 सिग्नलचे व्यवस्थापन केले जाते. महापालिकेमार्फत सुरू असलेल्या सिग्नल अनेक बंद पडत असल्याने वाहतूक यंत्रणा ठप्प पडते. महापालिकेच्या विद्युत विभागाकडून सिग्नलची देखभाल दुरुस्ती केली जाते. मात्र, मनुष्यबळ नसल्याने आउटसोर्सिंगच्या माध्यमातून सिग्नलचे देखभाल दुरुस्ती केली जाते.

औरंगाबाद महामार्गावर झालेल्या अपघाताच्या निमित्ताने शहरातील महापालिकेमार्फत सुरू असलेल्या 43 सिग्नलची देखभाल दुरुस्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी एकूण 29 लाख 14 हजार रुपयांच्या खर्चाला महासभेत मान्यता देण्यात आली. सिग्नलच्या देखभाल दुरुस्तीसाठी ठेकेदारांची नियुक्ती केली जाणार आहे. ठेकेदारांच्या माध्यमातून सिग्नलचे सुटे भाग बदलणे आदी कामे करून घेतली जाणार आहेत.