charging station
charging station Tendernama
उत्तर महाराष्ट्र

Nashik : अखेर महापालिकेच्या 20 चार्जिंग स्टेशन उभारणीला मुहूर्त

टेंडरनामा ब्युरो

नाशिक (Nashik) : महापालिकेकडून शहरात इलेक्ट्रिक वाहनांसाठी वीस ठिकाणी चार्जिंग स्टेशन उभारण्यास सुरवात झाली आहे. महापालिकेने एन कॅप योजनेतील १० कोटींच्या निधीतून चार्जिंग स्टेशन उभारण्याचा निर्णय घेतल्यानंतर जवळपास  दोन वर्षांनी चार्जिंग स्टेशन उभारण्यास सुरवात झाली असून लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता उठेपर्यंत ही कामे पूर्ण झालेली असतील, असा अंदाज आहे.

केंद्र व राज्य सरकारकडून हवेतील कार्बनचे प्रमाण कमी करण्यासाठी अपारंपरिक ऊर्जा वापराला प्रोत्साहन दिले जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन दिले जात आहे. त्यासाठी इलेक्ट्रिक वाहने खरेदीसाठी अनुदानही दिले जात आहे. यामुळे नागरिकांचा इलेक्ट्रिक वाहने खरेद करण्याकडे कल असला, तरी या वाहनांच्या बॅटरी चार्जिंग करण्याचा मोठा प्रश्न आहे. सार्वजनिक ठिकाणी पुरेशे चार्जिंग स्टेशन नसल्यामुळे या वाहनांचे वापर मर्यादित केला जात आहे. यामुळे इलेक्ट्रिक वाहनांची संख्या वाढवण्यासाठी चार्जिंग स्टेशनची आवश्यकता लक्षात घेऊन नवीन इमारती उभारताना आता बांधकाम व्यावसायिक तेथे चार्जिंग स्टेशनची सुविधा निर्माण करीत आहेत. तूर्त गृहनिर्माण सोसायटीच्या पार्किंगमधील वीजजोडणी माध्यमातून वाहने चार्जिंग केली जातात. भविष्यात इलेक्ट्रिक वाहनांची संख्या वाढणार असल्याने तेवढ्या प्रमाणात ई-चार्जिंग स्टेशनची गरज  लक्षात घेऊन नाशिक महापालिकेने शहरात १०६ इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन उभारण्याचे नियोजित केले आहे. मात्र, त्यासाठी महापालिकेकडे निधी नसल्यामुळे केंद्र सरकारकडून दिल्या जात असलेल्या राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमांतर्गत १० कोटींच्या निधीतून पहिल्या टप्प्यात २० ठिकाणी चाार्जिंग स्टेशन उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. चार्जिंग स्टेशनकरता महापालिकेने शहरात १०६ जागानिश्चित केल्या असून पहिल्या टप्प्यात २० ठिकाणी चार्जिंग स्टेशन उभारण्याचे काम सुरू झाले असून तीन महिन्यात पहिल्या टप्प्यातील वीस चार्जिंग स्टेशन उभारले जाणार आहेत. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपेपर्यंत काम पूर्ण होईल, असा अंदाज आहे.

दोन वर्षे उशीर
नाशिक महापालिकेने इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन उभारणीचा प्रस्ताव दोन वर्षांपूर्वी तयार केला होता. यासठी चार्जिंग स्टेशन उभारण्यासाठी इच्छुक कंपन्यांकडून टेंडर मागवण्यात आले होते. महापालिकेच्या यांत्रिकी विभागाने राबवलेल्या पहिल्या टेंडरमध्ये रिलायन्ससह टाटा सारख्या मोठया कंपन्यांनी सहभाग घेतला मात्र, या कंपन्यांनी प्रिबिड बैठकीनंतर टेंडरमधून माघार घेतल्याने याबाबत संशय व्यक्त करण्यात आला. त्यानंतर राबवलेल्या दुसर्या टेंडरला कमी प्रतिसाद मिळाल्याने ऑक्टोबर २०२३ ला तिसरी टेंडर प्रक्रिया राबवली. या टेंडर प्रकियेत दिल्ली येथील कंपनी या कामासाठी पात्र ठरली आहे. अखेर टेंडर प्रक्रिया पूर्ण होऊन आता प्रत्यक्ष चार्जिंग स्टेशन उभारण्यास प्रारंभ झाला आहे. या २० चार्जिंग स्टेशनसाठी साडेसात कोटी रुपये खर्च होणार आहे.

या २० ठिकाणी होताहेत चार्जिंग स्टेशन
राजीव गांधी भवन, पश्चिम विभागीय कार्यालय, पूर्व विभागीय कार्यालय, नाशिक रोड विभागीय कार्यालय, सातपूर विभागीय कार्यालय, पंचवटी विभागीय कार्यालय, सिडको विभागीय कार्यालय, तपोवन बस डेपो, अमरधाम फायर स्टेशन पंचवटी, सातपूर फायर स्टेशन, राजे संभाजी स्टेडिअम, बिटको हॉस्पिटल, कृषीनगर जॉगिंग ट्रॅक, भालेकर हायस्कूल मैदान, प्रमोद महाजन उद्यान, महात्मानगर क्रिकेट मैदान, दादासाहेब फाळके स्मारक, गणेशवाडी भाजी बाजार इमारत, लेखानगर, अंबड लिंक रोड.