Nashik Municipal Corporation
Nashik Municipal Corporation Tendernama
उत्तर महाराष्ट्र

Nashik : अबब! वृक्ष लागवडीसाठी ठेकेदारावर दोन कोटींची उधळण

टेंडरनामा ब्युरो

नाशिक (Nashik) : महापालिकेच्या उद्यान विभागाने शहरातील खुल्या जागांवर तसेच दुतर्फा वृक्ष संरक्षकासह लागवड केली जाणार आहे. अवघ्या १० हजार ५०० वृक्षरोपण व त्यांच्या संवर्धनासाठी तब्बल २ कोटी १६ लाख ७३ हजारांचा खर्च केला जाणार असल्याने एकप्रकारे वृक्षलागवडीच्या नावाने ठेकेदारांवर उधळ्पट्टी करण्यात येणार असल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे उद्यान विभागाला वृक्षारोपण केले पाहिजे याची आठवण पावसाळा संपल्यावर ऑक्टोबरमध्ये आली आहे.

उद्यान विभागाकडून शहरातील उद्यानांची देखभाल दुरुस्तीची कामे ठेकेदारामार्फत केली जाते. मात्र, अनेकदा या उद्यानांचा वापर ठेकेदार फक्त बिले काढण्यासाठी करत असल्याचे आरोप होत असतात. आता उद्यान विभाग शहारातील विविध खुल्या जागा, रस्त्यांच्या दुतर्फात वृक्षांचे रोपण करणार आहे.  या वृक्षरोपनाची जबाबदारी ठेकेदाराकडे देण्यात आली आहे. ठेकेदाराला तीन वर्ष वृक्षांचे संवर्धन करावे लागणार आहे. नाशिकरोड, सातपूर, पश्चिम, पंचवटी, नाशिक पूर्व, सिडको या सहाही विभागात वृक्ष लागवड करून त्यांना संरक्षक जाळ्या लावल्या जाणार आहेत. ठेका घेण्यापर्यंत सोपस्कर पूर्ण केले जातात. मात्र  त्यानंतर घेतलेल्या कामाकडे दूर्लक्ष करायचे, असा ठेकेदारांचा अनुभव नाशिककरांना नवीन नाही. यापूर्वीही महापालिकेने रस्ता दुभाजकांमध्ये केलेल्या वृक्षरोपनाबाबतही असाच अनुभव आहे. अनेक ठिकानच्या डिव्हायडरमध्ये झाडांएवजी मोठ-मोठे गवतच वाढले असल्याच्या तक्रारी आहेत. यामुळे सध्या गवत काढण्याचे काम सुरू आहे. दरम्यान उद्यान विभागाकडून पावसाळा संपल्यावर वृक्षारोपण करण्याच्या निर्णयाकडे यामुळे संशयाने बघितले जात आहे. 

उद्यान विभागाने प्रस्तावात सहाही विभागांत पावसाळा हंगामात वृक्ष लागवड करायची असे म्हणतात आता पावसाळा संपला याचे तरी भान ठेवणे गरजेचे होते. ठेकेदाराला एका झाडासाठी तीन वर्षांत दोन हजारांपेक्षा अधिक रुपये खर्च करायचे आहेत. त्यात संरक्षण जाळ्या लावाव्या लागणार आहेत. ठेकेदारावर उन्हाळ्यात ही झाडे जगवण्याचे मोठे आव्हान असल्याने ती लागवड कितपत यशस्वी होईल, याबाबत संशय व्यक्त होत आहे.

अशी होणार वृक्षलागवड

नाशिकरोड : १ हजार

सातपूर : २ हजार

नाशिक पश्चिम : १५००

नाशिक पूर्व : २ हजार

पंचवटी : २ हजार

सिडको :  २ हजार

असा होणार खर्च

नविन नाशिक ४० लाख ९५ हजार

पंचवटी ४१ लाख ५५ हजार ४४३

नाशिक पूर्व-४२ लाख ३२ हजार

पश्चिम- ३१ लाख ५१ हजार ४९०

सातपूर- ३९ लाख ६३ हजार ६०९

नाशिकरोड-२० लाख ७७ हजार ७१६