Nashik
Nashik Tendernama
उत्तर महाराष्ट्र

नाशिक सिटी लिंक प्रवास 25 टक्क्यांनी महागला; तोटा कमी करण्यासाठी..

टेंडरनामा ब्युरो

नाशिक (Nashik) : नाशिक परिवहन महामंडळ म्हणजेच सिटीलिंकने मागील वर्षात झालेला 20.21 कोटी रुपयांचा तोटा कमी करण्यासाठी भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार सिटीलिंकच्या संचालक मंडळाने शहर बसच्या प्रवाशी पास दरात 25 टक्के दरवाढ केली आहे.

महापालिका आयुक्त व नाशिक महानगर परिवहन महामंडळाचे. व्यवस्थापकीय संचालक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या अध्यक्षतेखाली महामंडळाच्या संचालक मंडळाची बैठक झाली. बैठकीत शहर बससेवेचा आढावा घेतला गेला. त्यानुसार सिटीलिंकला 2021-2022 या वर्षात 20.21 कोटी रुपये तोटा झाला आहे. तोटा कमी करण्यासाठी उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली. सध्या इंधन दर वाढल्यामुळे इंधनामुळे होणारा तोटा कमी करण्यासाठी प्रवाशांच्या पास दरात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. या पास दरात साधारणपणे 25 टक्के वाढ करण्याचा निर्णय झाल्याने विद्यार्थी, कामगार यांना त्याचा फटका बसणार आहे. या दरवाढीनंतर सिटी लिंक बसच्या एका दिवसाच्या पासची रक्कम 100 रुपये कायम राहणार असून, त्यापेक्षा अधिक दिवसांच्या पासचे दर 25 रुपयांनी वाढणार आहेत.

 'निमाणी'चे वीजबिल भरणार

बैठकीत राज्य महामार्ग परिवहन महामंडळाचे विभाग नियंत्रक अरुण सिया यांची नाशिक महानगर परिवहन महामंडळाच्या संचालकपदी नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर मागील बैठकीत मंजूर केलेल्या विषयांचा आढावा घेण्यात आला. राज्य परिवहन महामंडळाची मालकी असलेल्या निमाणी बसस्थानकाचा वापर सिटीलिंकतर्फे केला जात असल्यामुळे या बसस्थानकाचे वीजबिल, तसेच अन्य किरकोळ दुरुस्त्यांचा खर्च सिटीलिंकच्या माध्यमातून करण्याच्या प्रस्तावाला संचालक मंडळाने मंजुरी दिली.