Nashik Municipal Corporation
Nashik Municipal Corporation Tendernama
उत्तर महाराष्ट्र

नाशिकमधील घंटागाडीची टेंडर प्रक्रिया संशयाच्या फेऱ्यात; चौकशीचे...

टेंडरनामा ब्युरो

नाशिक (Nashik) : घंटागाडीचा ठेका घेण्यासाठी 354 कोटींच्या टेंडरप्रक्रियेत सहभागी झालेल्या ठेकेदार (Contractor) कंपन्यांनी सादर केलेली बँक गॅरंटी व बँक सॉल्वन्सी कागदपत्रांसंदर्भात संशय निर्माण झाल्याने महापालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी लेखापरीक्षकांना कागदपत्रांची छाननी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. यामुळे नव्या घंटागाड्यांचा 15 ऑगस्टचा मुहूर्त लांबणार आहे.

मागील वर्षी डिसेंबर महिन्यात घंटागाडीचा ठेका संपुष्टात आला. मात्र, त्यानंतर सातत्याने ठेक्याला मुदतवाढ दिली जात आहे. मागील ठेका 176 कोटी रुपयांना दिला गेला असताना आता पुढील पाच वर्षासाठी ठेका देताना 354 कोटी रुपयांवर गेल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. विशिष्ट ठेकेदारांना डोळ्यासमोर ठेवून अटी व शर्ती मध्ये बदल करण्यात आला आहे त्याचबरोबर ठराविक ठेकेदारांनाच काम मिळावे या अनुषंगाने रिंग देखील होत असल्याच्या चर्चा होत्या. माजी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी आढावा बैठकीत या टेंडरबाबत संशय व्यक्त केल्याने तत्कालीन आयुक्त पवार यांनी या टेंडर बाबत सावध पवित्रा घेतला होता.

टेंडर प्रक्रिया पूर्ण होऊन सर्वात कमी दर असलेले चार ठेकेदार निश्चित करण्यात आले आहेत. त्यानुसार नाशिक रोडभागात तनिष्क सर्व्हिसेस, नाशिक पश्चिम व सिडको भागात वॉटर ग्रेस, सातपूर, पंचवटीत ए. जी. एनरिओ इन्फ्रा व नाशिक पूर्व भागात सय्यद असिफअली यांना टेंडर देण्याचे जवळपास निश्चित होऊन नवनियुक्त आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्याकडे कार्यारंभ आदेश देण्यासाठी घनकचरा विभागाकडून या टेंडरची फाईल आली असता त्यांनी ती फाईल लेखा परिक्षकांकडे पाठवली आहे. ठेकेदारांनी टेंडर सोबत जोडलेली कागदपत्रे तसेच आर्थिक तरतुदी याबाबत पडताळणी करून निर्णय घेतला जाणार असल्याचे आयुक्तांचे म्हणणे आहे. यापूर्वी घनकचरा विभागामार्फत कागदपत्रांची तपासणी करण्यात आली आहे. नवनियुक्त आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांनी टेंडरची वाढलेली किंमत व ठेकेदारांकडून सादर करण्यात आलेली कागदपत्रे याबाबत तक्रारी आल्याचा कारणावरून पुन्हा लेखापरीक्षकांना कागदपत्रांची पडताळणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत.