Hospital
Hospital Tendernama
उत्तर महाराष्ट्र

नाशिकमध्ये सिडको, पंचवटीत प्रत्येकी 200 खाटांची रुग्णालये

टेंडरनामा ब्युरो

नाशिक (Nashik) : महापालिकेच्या सरकारच्यावतीने सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर पंचवटी व सिडको विभागात दोनशे खाटांचे रुग्णालय साकारले जाणार आहे. पंचवटी रुग्णालयाचा कच्चा आराखडा तयार झाला असून प्रस्तावित रुग्णालयाची स्थळ पाहणी करण्यात आली.

राज्यात शिंदे व फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघाचे आमदार राहुल ढिकले यांनी पंचवटी विभागामध्ये तर पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सीमा हिरे यांनी सिडकोतील कामगार वस्ती लक्षात घेऊन रुग्णालय उभारण्याची मागणी पालकमंत्री दादा भुसे यांच्याकडे केली होती.

दोन्ही मागण्यांची दखल घेत पालकमंत्री दादा भुसे यांनी प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार महापालिकेने प्रत्येकी दोनशे खाटांचे दोन रुग्णालयांचा प्रस्ताव तयार केला यामध्ये एका रुग्णालयासाठी ५५ कोटी रुपये खर्च प्रस्तावित करण्यात आला आहे. ही दोन्ही रुग्णालये उभारण्यासाठी राज्य सरकारकडून निधीची मागणी केली जाणार आहे.

महापालिकेच्या पंचवटी विभागीय कार्यालयातील भांडाराची जागा रुग्णालयासाठी निश्चित करण्यात आली आहे. महापालिकेचे शहर अभियंता शिवकुमार वंजारी यांनी जागेची पाहणी केली. रुग्णालयात तळमजल्यात वाहनांच्या पार्किंगसाठी जागा राहणार आहे. रुग्णालय उभारले जाणाऱ्या प्रस्तावित जागेवर सध्या व्यावसायिक गाळे आहेत. या व्यावसायिकांना तळमजल्यावर गाळे देऊन रुग्णालयासाठी तीन मजली इमारत प्रस्तावित करण्यात आली आहे.

रुग्णालयासाठी ३६५ पदे 

सरकारच्या नियमानुसार रुग्णालयांचा प्रस्ताव सादर करताना लोकसंख्येनुसार खाटांचे निकष ठरवण्यात आले आहेत. त्यानुसार दोन लाख पेक्षा कमी लोकसंख्या असल्यास १०० खाटांचे तर दोन ते पाच लाख लोकसंख्या असल्यास दोनशे खाटांचे रुग्णालय होऊ शकते. सिडको व पंचवटी विभागातील लोकसंख्या दोन लाखांच्या पुढे असल्याने त्या अनुषंगाने महापालिकेने या दोन्ही रुग्णालयांसाठी प्रत्येकी खाटांची संख्या निश्चित केली आहे. या संख्येनुसार प्रस्तावामध्ये पदांचीही संख्ये निश्‍चित करण्यात आली असून रुग्णालयामध्ये दोन विशेषतज्ञ, ३९ वैद्यकीय अधिकारी, २२४ स्टाफ नर्स, १८ तांत्रिक व २४ प्रशासकीय, १० एन्ट्री ऑपरेटर, साठ वॉर्ड बॉय, ४८ आया याप्रमाणे पदांची भरती केली जाणार आहे.