Nashik Municipal Corporation
Nashik Municipal Corporation Tendernama
उत्तर महाराष्ट्र

Nashik : स्मार्ट सिटी कंपनीला रस्ते खोदण्यास महापालिकेची बंदी

टेंडरनामा ब्युरो

नाशिक (Nashik) : स्मार्टसिटी कंपनीला शहरात काम करण्यासाठी सीमा निश्‍चित केली आहे. तसेच महापालिकेने १० मेनंतर रस्ते खोदण्यास मनाई केलेली असतानाही स्मार्ट सिटी कंपनीकडून रस्ते खोदकाम सुरू असल्याचे नागरिकांनी महापालिकेच्या बांधकाम विभागाच्या निदर्शनास आणून दिले. यामुळे बांधकाम विभागाने स्मार्टसिटी कंपनीला मनमानीला आवर घालण्यासाठी रस्ते खोदण्याचे कामे रद्द करण्याचे पत्र बांधकाम विभागाकडून देण्यात आले आहे.

स्मार्टसिटी कंपनीच्या माध्यमातून शहरात रस्त्यांची कामे मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. आत्तापर्यंत १९६ पैकी ९२ रस्त्यांचीच कामे पूर्ण झाली आहे, तसे पाहता स्मार्टसिटी कंपनीची मुदत संपुष्टात येत असल्याने त्यापूर्वीच काम होणे' अपेक्षित आहे. मात्र, रस्ते खोदकाम करणाऱ्या कंत्राटदार कंपनीला सलग तीन वेळा स्मार्टसिटी कंपनीकडून मुदतवाढ देण्यात आली आहे. स्मार्ट सिटी कंपनीकडून केल्या जाणाऱ्या कामांची मुदत सरकारनेही आत एक वर्षांसाठी वाढवली आहे. ही मुदत वाढवतानाच स्मार्ट सिटी कंपनीला केवळ जुनी कामे पूर्ण करण्याच्या सूचना असून नवीन टेंडर राबवू नये, असे स्पष्ट केले आहे. असे असतानाही स्मार्टसिटी कंपनीकडून पेठ रोडच्या ७५ कोटी रुपयांच्या कामासाठी टेंडर काढण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यामुळे स्मार्टसिटी कंपनीचा हा अतिरेकी हस्तक्षेप ठरत असल्याने महापालिकेने आता अधिकाराचे अस्त्र उगारले आहे. यापूर्वीच आमदार ॲड. राहुल ढिकले यांनीही स्मार्ट सिटी कंपनीच्या कामकाजाची तक्रार पंतप्रधान कार्यालयाकडे करण्याचा इशरा दिला असतानाच महापालिकेने कठोर भूमिका घेत स्मार्टसिटी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुमंत मोरे यांना पत्र लिहून रस्ते खोदण्याची कामे रद्द करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

शहरात रस्त्याची कामे करताना महापालिकेच्या बांधकाम विभागाने सीमारेषा मंजूर केली आहे. त्या रेषेच्या बाहेर स्मार्टसिटी कंपनीकडून खोदकाम करण्यात आली आहे. यामुळे महापालिकेचे आर्थिक नुकसान तर झाले आहेच, त्याशिवाय नागरिकांनादेखील मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. कुठलेही काम करताना महापालिकेच्या बांधकाम विभागाशी समन्वय साधने गरजेचे आहे. परंतु स्मार्टसिटी कंपनीकडून कुठल्याही प्रकारचा समन्वय साधला गेला नाही. नागरिकांकडून महापालिकेकडे तक्रारी वाढल्या. यामुळे अखेरीस स्मार्ट सिटी कंपनीकडून शहरात सध्या सुरूच असलेली रस्ते खोदकाम बंद करण्याचे पत्र देण्यात आले आहे.
 रस्ते खोदायची सीमारेषा निश्चित करण्यात आली आहे. त्याबाहेर खोदकाम करण्यापूर्वी महापालिकेच्या अभियंत्यांची परवानगी घेणे गरजेचे आहे. मात्र, परवानगी न घेता खोदकाम होत असल्याने कामे रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे महापालिकेचे शहर अभियंता शिवकुमार वंजारी यांनी सांगितले.